अभाविपतून बाहेर पडलेले रेवंत रेड्डी होणार तेलंगनात काँग्रेसचे मुख्यमंत्री

0
262

हैदराबाद, दि. ३ (पीसीबी) : तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालात भारत राष्ट्र समितीची मोठी पीछेहाट पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलातच काँग्रेसने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत काँग्रेसने ६१ जागांवर आघाडी घेतली असून बीआरएसला ५० जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे सलग दोन टर्म सत्तेत असलेल्या बीआरएस पक्षासाठी हा मोठा धक्का आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार रेवंत रेड्डी यांनीही केसीआर यांना कामारेड्डी मतदारसंघात घाम फोडला आहे. पहिल्यांदाच कामारेड्डी मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या केसीआर यांची काँग्रेस उमेदवार रेवंत रेड्डी यांच्यासमोर पीछेहाट होताना दिसत आहे.

तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष असलेले रेवंत रेड्डी या निवडणुकीत पक्षाचा प्रमुख चेहरा राहिले आहेत. जर काँग्रेस पक्ष तेलंगणात सत्तेत आला तर रेवंत रेड्डी हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील असे मानण्यात येत आहे. रेवंत रेड्डी हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. मल्काजगिरी मतदारसंघातून विजय मिळवत त्यांनी संसद गाठली. याआधी रेड्डी हे चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षात होते. टीडीपीकडून आमदारकी लढवताना रेड्डी यांनी पाच वेळा आमदार असलेले तत्कालीन काँग्रेस नेते गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला होता. २०१४ सालीही त्यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला होता. यानंतर २०१७मध्ये त्यांनी टीडीपीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा हात पकडला. काँग्रेसने रेवंत रेड्डी यांना २०२१मध्ये प्रदेशाअध्यक्ष केले.

रेड्डी यांनी केली होती ABVP मधून सुरुवात
रेवंत रेड्डी यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली होती. पुढे २००७ साली रेड्डी यांना अपक्ष उमेदवार म्हणून आंध्र प्रदेश विधानपरिषदेवर सदस्य म्हणून संधी मिळाली. आता ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.