मुंबई, दि. २९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप २६ जागांवर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने १३ खासदार यांची उमेदवारी निश्चित केली आहे. मात्र उर्वरित ९ जागा अजित पवार गटाला सोडण्यास शिवसेनेचा विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, महायुतीत फाटाफूट होऊ नये म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस जोरदार प्रयत्न करत असल्याचे समजले.
भाजप शिवसेना युतीचा २३-२५ चा फॉर्म्युला ठरला होता. पण, आता अजित पवार गटाला नऊ जागा सोडण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुतीत जरी सहभाग घेतला असला तरी उर्वरित ९ जागा सोडण्यास शिवसेना तयार नसल्याने महायुतीत मिठाचा खडा पडणाची शक्यता आहे. अजित पवार गट २६-११-११ अशा फॉर्म्युलाची मागणी करणार असल्याचे कळते.
शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांनी फुटून भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली. त्यामुळे शिंदे सरकार राज्यात अस्तित्वात आलं. काही काळाने राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून अजित पवार गटही भाजपला येऊन मिळाला आहे. त्यामुळे राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे मिळून महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे.
तीन पक्ष एकत्र आले आहेत. पण, त्यांच्यामध्ये जागा वाटपावरुन मतभेद निर्माण होत आहेत. फडणवीसांनी २६ जागांवर भाजप लढवेल हे स्पष्ट करुन टाकलं आहे. त्यामुळे उरलेल्या जागेवर तरी शिवसेनेला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण, अजित पवार गटही सत्तेत आला असल्याने त्यांना काही जागा सोडाव्या लागणार आहेत. पण, यासाठी शिंदेंची शिवसेना तयार नसल्याचे समजते.
देशात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. पण, इंडिया आघाडीचे जागा वाटप अद्याप निश्चित झालेले नाही. दुसरीकडे महायुतीमध्ये देखील जागा वाटपावरुन तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात काय तोडगा काढला जातो हे पाहावं लागणार आहे