पुणे, दि. २७ (पीसीबी) : मराठा – ओबीसी आरक्षणावरून राज्यात जोरदार वाद पेटत असताना सोमवारी याचे पडसाद पुण्यातही उमटले. राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सोमवारी पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. कॅम्प परिसरातील शासकीय विश्रामगृहात एक बैठक होते. त्यावेळी स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी या ठिकाणी धडक देत थेट छगन भुजबळ यांना त्यांची गाडी फोडण्याचा इशारा दिला. या प्रकारामुळे येणाऱ्या काळात ओबीसी मराठा आरक्षणाचा वाद अधिकच पेटण्याची शक्यात आहे.
शासकीय विश्रामगृहात स्वराज्य संघटनेने केलेल्या या प्रकारामुळे ओबीसी कार्यकर्ते देखील चांगलेच आक्रमक झाले असून हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. एकमेकांच्या विरोधात आक्रमक होत हे दोन्ही नेते कडक शब्दात टीका टिपण्णी करत आहेत. पुण्यात मंगळवारी आयोजित कार्यक्रमासाठी भुजबळ हे पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. ते सोमवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात कार्यकर्ते तसेच ओबीसी समाजाचे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. त्याचवेळी धनंजय जाधव तेथे आले. जाधव यांनी आपली गाडी छगन भुजबळ यांच्या गाडी शेजारी लावली. त्यानंतर भुजबळांना दोन्ही गाड्यांमधील अंतर दाखवत तुमची गाडी फोडण्यासाठी फार वेळ लागणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.
धनंजय जाधव म्हणाले की, ‘मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. राज्यात ओबीसी-मराठा वाद निर्माण होऊ नये, अशी श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका आहे. त्यासाठी ते प्रयत्न करत असताना दुसरीकडे छगन भुजबळ हे समाजात वाद निर्माण होतील, अशी विधाने करत आहेत. मराठा नेत्यांचे हात-पाय तोडण्याची धमकी देत आहेत. आम्ही आता केवळ इशारा दिला आहे. प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आम्हाला थोडाही वेळ लागणार नाही.’