पिंपरी,दि.२७(पीसीबी) – पुणे -नगर मार्गावरील वडगाव शेरी फाटा येथे इथिलीनची वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर गॅस गळती झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी वाहतूक बंद केली असून अन्य मार्गाने वळवली आहे.
पुणे अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त टँगर इथिनील ऑक्साईड या ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करत होता. पहाटेच्या सुमारास पुणे-नगर मार्गावरील वडगाव शेरी फाटा येथे टँकर पलटी झाला. याची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. टँकरमधून गॅसगळती होत असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांमधून पाण्याचे फवारे मारले जात आहे. गॅसगळती रोखण्यासाठी रिलायन्स पेट्रोकेमिकल्सचे तज्ज्ञही घटनास्थळी उपस्थित झाले असून टाकी रिकामी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान टाकी रिकामी करेपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि गॅस हवेत मिसळू नये यासाठी टँकरवर पाण्याचे फवारे मारण्यात येत आहे. यासाठी वडगाव शेरी पंपिंग स्टेशन जवळील दोन फाईव्ह स्टार हॉटेलच्या पाण्याच्या टाक्यांमधून पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
कसा झाला अपघात?
अपघातग्रस्त टँकर इथिनील ऑक्साईड या ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करत होता. वडगाव शेरी फाट्याजवळील ईबीज ह़ॉटेल समोरील दुभाजकाला धडकून टँकर पलटी झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज असून अपघातानंतर चालकाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती विमानतळ वाहतूक पोलीस निरीक्षक मनोहर इडेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.