काळेवाडी, दि. २६ (पीसीबी) – चालक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने कार खरेदीच्या बहाण्याने नेलेली कार परत न देता तसेच ठरलेल्या व्यवहाराचे पैसे न देता मालकाची फसवणूक केली. ही घटना 20 ऑक्टोबर रोजी विजयनगर, काळेवाडी येथे घडली.
योगेश काशिनाथ केदार (वय 43, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 25 नोव्हेंबर) वाकड पोलीसठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास प्रतापराव म्हस्के (वय 49, रा. देवाची उरुळी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास म्हस्के हा फिर्यादी केदार यांच्याकडे पूर्वी चालक म्हणून काम करत होता. त्याने फिर्यादी यांची कार (एमएच 14/सीएक्स 6389) दोन लाख 55 हजार रुपयांना विकत घेतो असे सांगत व्यवहार ठरवला. कारवर असलेले दोन लाख रुपये कर्ज विकास हा फेडणार असून उर्वरित 55 हजार रुपये तो केदार यांना देणे लागत होता. त्यानुसार त्याने केदार यांना 55 हजारांचा धनादेश दिला. केदार यांनी धनादेश बँकेत जमा केला असता तो बाउंस झाला. त्यामुळे केदार यांनी विकास याच्याशी वारंवार संपर्क केला असता ‘तुला काय करायचे ते कर. मी गाडी देणार नाही’ असे म्हणून त्याने फोन कट केला. याप्रकरणी केदार यांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.