जालना, दि. २२५ (पीसीबी) – आमचे लोक अटक करणार नाही असं आश्वासन सरकारने दिलं होतं तरीही जालन्यातून सरकारने आमच्या काही लोकांना अटक केली आहे. यामागे सरकारचा कोणता डाव आहे? असा प्रश्न मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. तसंच छगन भुजबळ गप्प राहिले तर आम्हीही गप्प राहू असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
“आंतरवलीतले कार्यकर्ते अटक करणार नाही असं सरकारने सांगितलं होतं. मग आमचे लोक अटक करण्याचं कारण काय? आमचे लोक अटक करुन आम्हाला बदनाम करण्याचा डाव रचला आहे का? आमच्यावर अन्याय झाला आहे हे सांगून तुमच्या कार्यकर्त्यांना अटक करणार नाही हे सरकारने सांगितलं होतं. मात्र आता आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली जाते आहे. यामागे कोणता तरी डाव आहे हे उघड आहे. सगळ्या महाराष्ट्रातलेच कार्यकर्ते आमचे आहेत. समाजाला न्याय देण्यासाठी मराठा समाज एकवटला आहे. अटक करण्याची भूमिका नव्हती तरीही अटक का केली गेली? मला या प्रकरणाची अधिकृत माहिती घेतली की बोलेन. आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळांवरही मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं, “छगन भुजबळ यांनी आमच्या आरक्षणाला विरोध करायला सुरुवात केली आणि ते वाट्टेल ते आरोप करत आहेत. मग आम्ही उत्तर देणारच. आम्ही छगन भुजबळ यांना कुठलाही त्रास दिला नाही. त्यांनी बोलणं बंद केलं तर आम्हीही बोलणं बंद करतो. ” असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.