धीरेंद्र शास्त्री देहूतील मंदिरात दर्शनाला

0
454

पुणे, दि. २२ (पीसीबी) : बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अखेर देहूतील मंदिरात येऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. काही दिवसांपूर्वी धीरेंद्र शास्त्री यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती, यावरून वाद रंगला होता. पुण्यात सुरू असलेल्या त्यांच्या कार्यक्रमाला देखील वेगवेगळ्या संघटनांनी विरोध दर्शवला. अखेर त्यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल केलेल्या टिप्पणी बद्दल माफी मागत संत तुकाराम महाराज हे भगवानाचे रूप असल्याचे म्हटले आहे.

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे अनेकदा विविध वक्तव्यावरून चर्चेत आलेले आहेत. पुण्यात झालेल्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि भीम आर्मी एकता बहुजन संघटनेकडून त्यांना विरोध दर्शविण्यात आला होता. त्यापूर्वी धीरेंद्र शास्त्री यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावरून देखील त्यांनी दोन वेळेस माफी मागितली आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा मी आदर करतो, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना मी देवासमान मानतो. देहू येथील मंदिरात जाऊन मी दर्शन घेणार आहे. संतांचा विरोध कोणीच करू शकत नाही, असंही धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं होतं. धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरात येऊन दर्शन घेतलं आहे. यावेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात होता. देहू संस्थानच्या वतीने धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा सत्कारही करण्यात आला आहे.

दरम्यान, या बागेश्वर धामच्या महाराजांना उपरती झाली आणि ते देहुत आले याबद्दल देहू संस्थानचे संभाजी महाराज मोरे यांनी समाधान व्यक्त केले. संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल कोणताही अभ्यास न करता विधान केल्याचा त्यांना पश्चाताप झाला असावा असे मोरे म्हणाले.