केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भावाला मराठा समाजाने बैठकितून हाकलले

0
314

जालना, दि. २० (पीसीबी) : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातील भोकरदन तालुक्यात मराठा आंदोलकांनी लावलेले गावबंदीचे बॅनर फाडल्यामुळे वाद निर्माण झाला होता. मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणावरून दानवे पिता-पुत्रांवर सडकून टीकाही केली होती. त्यानंतर आता रावसाहेब दानवे यांचे चुलत बंधू जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर पाटील दानवे यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

दोन दिवसांपुर्वी जालना येथे मनोज जरांगे पाटील यांच्या १ डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेच्या नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीत भास्कर दानवे हेही उपस्थितीत होते. बैठकीत भाषणासाठी ते उभे राहिले आणि तिथे उपस्थितीत मराठा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. ओबीसी मेळाव्याला आलेल्या नेत्यांना भेटून त्यांना मेजवाणी देता आणि पुन्हा मराठा आरक्षणाच्या बैठकीतही हजेरी लावता, अशी दुटप्पी भूमिका चालणार नाही, असा आक्षेप काही पदाधिकाऱ्यांनी घेतला.

प्रसंगावधान राखत भास्कर दानवे यांनीही मग भाषण न करता बैठकीतून काढता पाय घेतला. या प्रकाराची जिल्ह्यात सध्या चर्चा होत आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सध्या राज्यभरात सरू आहे. मनोज जरांगे यांच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ, काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्यासह अनेक ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत.

जालना येथे या नेत्यांच्या उपस्थिती नुकताच महाएल्गार मेळावाही पार पडला. या मेळाव्यासाठी आलेले रासपचे नेते महादेव जानकर, विदर्भातील माजी आमदार व भाजप नेते आशिष देशमुख व इतर ओबीसी पदाधिकाऱ्यांसोबत भास्कर दानवे यांनी एकत्रित भोजन केल्याचे फोटोही समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. याचा राग मराठा आंदोलकांच्या मनात होता, नेमके त्याचेच पडसाद १८ रोजीच्या नियोजन बैठकीत उमटले. ओबीसी महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर कडाडून टीका केली होती.

या टीकेला जालना येथील १ डिसेंबर रोजीच्या सभेतून मनोज जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या सभेच्या नियोजनासाठी बैठका घेतल्या जात आहेत. अशाच एका बैठकीत भास्कर दानवे यांना भाषणापासून रोखत जोरदार घोषणाबाजीचा प्रकार समोर आला आहे. ओबीसी आणि मराठा अशा दोन्ही नेत्यांसोबत वावरणाऱ्या भास्कर दानवे यांना जाब विचारत मराठा आंदोलकांनी त्यांना भाषणापासून रोखत बैठकीतून बाहेर जाण्यास भाग पाडले.