सदनिका घेऊन देण्याच्या बहाण्याने 16 लाखांची फसवणूक

0
174

देहूगाव, दि. १९ (पीसीबी) – सदनिका घेऊन देतो असे सांगत एका व्यक्तीच्या नावे 16 लाख 26 हजार रुपयांचे गृह कर्ज घेतले. यामध्ये मध्यस्थी, बांधकाम व्यावसायिक आणि बँकेचा व्यवस्थापक यांचा समावेश आहे. कर्ज मंजूर करून घेतल्यानंतर एकदा विकेलेली सदनिका पुन्हा विकून ती व्यक्तीच्या नावावर करून देत फसवणूक केली. ही घटना मार्च 2017 ते 18 नोव्हेंबर 2023 या कालावधीत देहूगाव येथे द्वारका स्कीम येथे घडली.

गिरीश व्यंकट नारलावार (वय 26, रा. धनकवडी, पुणे), बांधकाम व्यावसायिक गिरीश धनराज भटेवारा (रा. पिंपळे गुरव), बँकेचा तत्कालीन व्यवस्थापक राजेंद्र सुरेश शिळीमकर (वय 42, रा. नऱ्हे, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमोल शिवाजी गेडेवाड (वय 38, रा. मुखेड, जि. नांदेड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश याने फिर्यादी अमोल यांना विश्वासात घेऊन त्यांना सदनिका देण्याचे आमिष दाखवले. अमोल यांची कागदपत्रे वापरून त्यांच्या नावे बँकेचा तत्कालीन व्यवस्थापक राजेंद्र शिळीमकर यांच्या मदतीने 16 लाख 26 हजार 956 रुपयांचे गृहकर्ज मंजूर केले. बांधकाम व्यावसायिक गिरीश भटेवरा यांनी देहूगाव येथील द्वारका स्कीम मधील सदनिका क्रमांक 405 ही गौतम भागुजी डोळस यांना यापूर्वीच विकलेली असताना त्या सदनिकेचे पुन्हा फिर्यादी यांच्या नवे रजिस्ट्रेशन करून पुन्हा विक्री केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत