जालना, दि. १७ (पीसीबी) -राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाने आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र हवे आहे, तर, ओबीसींनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. यावरून राज्यातील वातावरण तापलेलं असताना छगन भुजबळांनी आज जालन्यातून तुफान भाषण केलं. मराठ्यांनी केलेल्या गावबंदीवरूनही त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजावर तोफ डागली.
“मराठा समाजाकडून गावबंदी करण्यात आली. आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी. काय रे महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय रे.जशास तसं उत्तर द्यावं लागेल. मी सांगितलं करेंगे या मरेंगे. आणि तुमचा पाव्हना म्हणतो, बघा हा हिंसाचार आहे. करेंगे आणि मरेंगे हे महात्मा गांधींचं वाक्य आहे. आणि हे म्हणतात की लढेगें आणि जितेंगे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“पोलिसांना माझं सांगणं आहे की गावातील गावबंदीचे फलक हटवले पाहिजेत. हे लोकशाहीचे राज्य आहे. आमदार, राजकीय नेत्यांना गावात घ्यायचं नाही, दोन चार पोट्टी बोर्ड लावतात गावात यायचं नाही आणि धांदल करतात. हे आता चालणार नाही. सरकार आहे की नाही, कायदा आहे की नाही. आणि तुम्ही पक्षपातीपणा कराल तर ओबीसीसुद्धा गप्प बसणार नाही. ओबीसींच्या जोडीला दलित, मुस्लिम, आदिवासी सर्व एकवटल्याशिवाय राहणार नाही”, असा घरचा आहेरही त्यांनी सरकारला दिला.
“मला तर रोज धमक्या, शिवागाळ, उपमुख्यमंत्र्यांनाही शिव्या मिळतात. पोलिसांना तक्रार केली तरी काही होत नाही. येवल्यात कसा निवडून येतो ते पाहतो, असं ते म्हणलतात. पण काय बघतो तू.. चार पोट्टी निघतात आणि याचा राजीनामा घ्या म्हणतात. काही लोक म्हणतात भडकाऊ भाषणं नका करू. मी भडकाऊ भाषणं करतोय? मी दोन महिने सहन करतोय. भडकाऊ भाषण कधी केलं? समाजात वितुष्ट लावू नका असं मला म्हणाले. मी कधी समाजात वितुष्ट लावंलं? त्यांनी भडकाऊ भाषणं केली तरी चालतं. हम आह भरते है तो बदनाम हो जाते है, वो कत्ल करते हे तो चर्चा नही होता”, असाही हल्लाबोल त्यांनी केला.
“गाव झालं, आता देवही यांच्या सातबाऱ्यावर झाले. पंढरपुराला अजित पवारांना म्हणाले यायचं नाही. पंढरपुच्या देवालाही जात लागली का? कित्येक साधू संतांची किती नावे सांगायचं. पंढरपूरचा राजा सर्वांचा आहे. आरक्षण देत नाही म्हणून आम्ही तिथं यायचं नाही? खोलात गेलं तर पंढरपूरचा राजा कृष्णाचा अवतार आणि कृष्णा यादवकुळातील म्हणजे ओबीसी. आता त्याला जातच लावायची ठरली तर लावा जात”, असाही एल्गार त्यांनी आज केला.