तब्बल १५ लाखांचे मोबाईल चोरणाऱ्याला मुंबईतून अटक

0
325

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – मुंबईमध्ये मोबाईल फोन दुरुस्तीचे दुकान असलेल्या दुकानदाराच्या सांगण्यावरून चाकण येथील एका व्यक्तीने एका मोबाईलच्या दुकानात चोरी करून 15 लाखांचे 27 महागडे मोबाईल चोरले. या प्रकरणाचा उलगडा दरोडा विरोधी पथकाने केला आहे. मुंबई मधून दोघांना अटक करत त्यांच्याकडून 11 लाखांचे 21 मोबाईल फोन जप्त केले आहेत.

कामील हुसेन अन्सारी (वय 33, रा. बांद्रा बस डेपो जवळ, पश्चिम मुंबई), फिरोज नईम खान (वय 33, रा. आळंदी फाटा, चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर रोजी संविधान चौक, भोसरी येथील क्लासिक कम्युनिकेशन मोबाईल शॉपी हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. दुकानच्या टेरेसवरील स्लॅबच्या बाजूला बसवलेला बार काढून आत प्रवेश केला. दुकानातून 15 लाख 18 हजार 962 रुपये किमतीचे 27 महागडे मोबाईल फोन चोरीला गेले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास दरोडा विरोधी पथकाकडून केला जात होता.

दरोडा विरोधी पथकातील पोलीस अंमलदार सुमित देवकर यांना माहिती मिळाली की, दुकानात चोरी करणारे आरोपी कुर्ला मुंबई परिसरात आहेत. त्यानुसार दरोडा विरोधी पथकातील पोलिसांनी कुर्ला मुंबई आणि अंबरनाथ ठाणे येथे तपास करून दोघांना ताब्यात घेतले.

कामील याचे कुर्ला मुंबई येथे मोबाईल विक्री आणि दुरुस्तीचे दुकान आहे. त्याने फिरोज याला मोबाईल चोरण्यास सांगितले. चोरलेले मोबाईल कामील हा त्याच्या दुकानातून ग्राहकांना विकणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चोरीच्या मोबाईल पैकी 11 लाख 68 हजार 270 रुपये किमतीचे 21 मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, नितीन लोखंडे, सुमित देवकर, गणेश हिंगे, प्रवीण कांबळे, आशिष बनकर, गणेश कोकणे, गणेश सावंत, विनोद वीर, विक्रांत गायकवाड, सागर शेडगे, नागेश माळी, पोपट हुलगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.