मुंबई, दि. ११ (पीसीबी) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 40 मिनिटे चर्चा झाल्याची चर्चा आहे. अजितदादा हे आजारी असतानाही अमित शाह यांना भेटायला गेले. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजितदादांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवार आणि अमित शाह यांच्या भेटीचं कारण काहीही असेल. पण मराठ्यांनी राजकारणातला स्वाभिमान विकाला आहे. ते दिल्लीचे चरणदास झाले आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते टीव्ही9 मराठीशी संवाद साधत होते.
तुम्ही आजारी आहात. कार्यकर्त्यांना भेटू शकत नाही. तुम्हाला थकवा आला आहे. शरीर कमजोर झालं आहे. दिवाळीत कार्यकर्त्यांना भेटणार नाही, असं तुम्ही सांगितलं. ठिक आहे, तो तुमचा प्रश्न आहे. साधारणपणे आजारी असलेल्या माणसाला लोक भेटायला येतात. पण मी पहिल्यांदाच पाहिलं डेंग्यूने आजारी असलेला माणूस त्याच्या नेत्याला भेटायला गेल्याचं पाहिलं. हे दुर्देव आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले.
अमित शाह यांनी भेटावं
त्यांना डेंग्यू झालेला आहे. त्यांना मी चालताना पाहिलं. त्यांचे खांदे खाली आले आहेत. ते आजारी असल्याचं स्पष्ट दिसतं. अजितदादांना विश्रांतीची गरज आहे. उलट त्यांनाच दिल्लीतील प्रमुख नेत्यांना भेटायला आले पाहिजे. शरद पवार यांच्या घरातून एक बडा नेता फोडला, या नेत्यासोबत 40 आमदार आहेत, अशा नेत्याला स्वत: अमित शाह यांनी येऊन भेटलं पाहिजे होतं. पण आजारी माणसाला अंथरुणातून उठून दिल्लीला जावं लागलं ही महाराष्ट्रावर आलेली वेळ आहे, अशी टीका त्यांनी केली.