शब्द, सुर आणि तालांच्या मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध

0
317

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी पहाट या कार्यक्रमात शब्द,सुर आणि तालांच्या मैफिलीने रसिकांना काल मनोरंजनाचे अभ्यंगस्नान घडले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाद्वारे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले.

चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास आयुक्त यांच्यासह त्यांचे वडील चंद्रहास सिंह,क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,अकादमीचे पर्यवेक्षक अरुण कडूस तसेच क्रीडा विभागाचे अधिकारी आणि क्रीडा पर्यवेक्षक तसेच इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस चिराग कट्टी यांनी सतार वादन सादर केले, त्यांनी आपल्या खास शैलीत राग भटियार सादर केला, सुरुवातीला आलाप जोड झाला आणि त्यानंतर विलंबित तीनताल आणि त्यानंतर मध्यलय आणि द्रुतलय तीनतालामध्ये गतीचे सादरीकरण केले, त्यांना तबल्यावर साथ विनोद सुतार यांनी केली.

यानंतर ख्यातनाम गायिका स्मिता देशमुख यांनी शास्त्रीय गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. देशमुख या मेवाती घराण्याच्या गायिका आहेत,त्यांना तबला साथ संतोष साळवे यांनी, हार्मोनियमची साथ ओजस रानडे तर त्यांना तानपुराची साथ भाग्यश्री लोहार आणि नीलिमा बोरकर यांनी केली. सुरुवातीला राग अहिर भैरव आणि त्यानंतर अभंग अवघे गरजे पंढरपुर सादर करून त्यांनी आपले गायन पूर्ण केले.

दूस-या सत्रात व्हायोलिन आणि बासरी यांची जुगलबंदी म्हणजेच सहबादन सादर झाले. प्रसिद्ध व्हायोलिन वादक मानस कुमार आणि प्रसिद्ध बासरी वादक पंडित विवेक सोनार यांनी राग नटभैरव मध्ये विलंबित झपताल आणि त्यानंतर मध्यलय तीन ताल सादर केला. त्यानंतर पहाडी धून वाजवून त्यांनी आपल्या जुगलबंधी कार्यक्रमाची सांगता केली. त्यांना तबल्यावर साथ पंडित समीर सूर्यवंशी यांनी दिली.

आजच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाची सांगता जगद्विख्यात गायक पंडित शौनक अभिषेकी यांच्या गायनाने झाली त्यांनी राग शुद्ध सारंग रागामध्ये बडाख्याल आणि छोटाख्याल तसेच चतरंग सादर केला, त्यानंतर लोकाग्रहास्तव खटतोडी रागामध्ये अध्धा तीनताल आणि द्रुत एकताल मध्ये बंदिशी आणि तराना सादर करून रसिकांची वाहवा मिळवली आणि सर्वात्मका सर्वेश्वरा या भैरवीने आपल्या गायनाची सांगता केली. यांना तबला साथ संतोष साळवे आणि हार्मोनियम साथ उदय कुलकर्णी यांनी केली.

यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी शहरवासीयांना दिपावली निमित्त शुभेच्छाही दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक आणि मिलिंद दलाल यांनी केले आणि प्रस्तावना,आभार प्रदर्शन समीर सूर्यवंशी यांनी केले.