दुटप्पी भूमिका घेणाऱ्या भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा :मराठा क्रांती मोर्चा

0
177

पिंपरी, दि. ९ (पीसीबी)- सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने उग्ररूप धारण केले आहे कोट्यावधी मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात विविध आंदोलने करत आहे मुळातच कुणबी असलेला मराठा समाज कुणबी दाखले मिळावेत अशी मागणी करतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने हा प्रश्न सोडवण्यासाठी काही निर्णय एकमताने घेतले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ पाठवले होते. या शिष्टमंडळात मा. न्यायमूर्ती सुद्धा होते. याविषयी मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.

कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजास सरकार कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. हे देखील भुजबळांना मान्य नाही. कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये. सर्व जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, ही मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाची भूमिका आहे. यासाठी जातीनिहाय जनगणना करावी. ही मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे. ही शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना अभिप्रेत असलेली भूमिका आहे; परंतु याविषयी भुजबळ आग्रही नाहीत. मंत्रिमंडळात याविषयी गप्प बसतात, महात्मा फुले यांच्या नावाने समता परिषदेचे कार्य करणारे भुजबळ हे समतावादी नसून असमानतावादी आहेत. मंत्रिमंडळात एक भूमिका व बाहेर दुसरी भूमिका घेऊन भुजबळ सध्याच्या ओबीसी समाजासह मराठा समाजाची व संपूर्ण महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत.

प्रक्षोभक वक्तव्य करून भुजबळ राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत समाजात तेढ निर्माण करणे, विशिष्ट समाजा-समाजावर अन्याय करणे, संविधानास अभिप्रेत असलेले भूमिका न घेता संविधानाविरोधी वक्तव्य करणे, मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या विरोधात भूमिका मांडणे,हे सर्व मंत्रिपदाच्या शपथेचे उल्लंघन आहे.तेंव्हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा घ्यावा.अथवा त्यांना मंत्रिपदावरून काढून टाकावे, अशी मागणी मंगळवार दि. ७ रोजी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पिंपरी चिंचवडच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली.यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे सतीश काळे,प्रकाश जाधव मारुती भापकर,वैभव जाधव,नकुल भोईर,सुनिता शिंदे,कल्पना गिड्डे,मीरा कदम,रावसाहेब गंगाधरे,अशोक सातपुते,संतोष शिंदे,श्याम पाटील,अरविंद जगताप,संपतराव जगताप इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते