बँकेने सील केलेले दुकान उघडून दोन लाखांच्या साहित्याची चोरी

0
258

भोसरी ,दि.०७(पीसीबी) – नियमितपणे कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे बँकेने सील केलेल्या दुकानाचे सील उघडून त्यात बँकेने ठेवलेले दोन लाखांचे साहित्य चोरीला गेले. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 ऑक्टोबर रोजी दुपारी वसंत इलेक्ट्रोनिक्स, जय महाराष्ट्र चौक, आळंदी रोड, भोसरी येथे घडला.

वसंत श्रीपती दसगुडे, प्रवीण वसंत दसगुडे, प्रदीप वसंत दसगुडे, दोन महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजी परशुराम खंडागळे (वय 56, रा. नवी मुंबई) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जी एस महानगर को ऑप बँक लि. मध्ये नोकरी करतात. आरोपींनी या बँकेतून कर्ज घेतले आहे. त्या कर्जासाठी आळंदी रोडवर असलेले दुकान बँकेकडे तारण ठेवले होते. कर्जाचे नियमितपणे हप्ते न फेडल्याने बँकेने दुकान सील केले. त्यानंतर आरोपींनी सील तोडून दुकानाचा अनधिकृतपणे ताबा घेतला. दुकानात बँकेने ठेवलेली महत्वाची कागदपत्रे, जुने संगणक, कॅश काउंटिंग मशीन असा एकूण दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.