“उपेक्षित श्रमिकांची दखल घेणे हे माणुसकीचे लक्षण!”

0
204

पिंपरी (दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२३) “स्वच्छता कर्मचाऱ्यांसारख्या उपेक्षित श्रमिकांची दखल घेणे हे माणुसकीचे लक्षण आहे!” असे गौरवोद्गार पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी सोमवार, दिनांक ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी सोहम् सार्वजनिक ग्रंथालय, संत तुकारामनगर, पिंपरी येथे काढले. ग्रंथालयाच्या वतीने दीपावलीनिमित्त संत तुकारामनगर येथील ‘ह’ प्रभागातील कचरावेचक आणि स्वच्छतादूत महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना राम राजमाने बोलत होते. माजी नगरसेविका डॉ. सुलक्षणा धर, सुजाता पालांडे, महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती मायला खत्री, संत तुकारामनगर व्यापारी संघटना अध्यक्ष किरण सुवर्णा, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पवार, भारतीय युवा काँग्रेसचे प्रवक्ते गौरव चौधरी, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक – अध्यक्ष जगन्नाथ नेरकर, सचिव प्रदीप बोरसे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी ज्योत्स्ना जाधव, तुळसाबाई प्रधान, खाजाप्पा गायकवाड, रेखा साळवे, संगीता भिसे, पारू पवार यांना नवीन कपडे, सुकामेवा आणि मिठाई प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याचबरोबर ग्रंथालयाचे सदस्य गौरव चौधरी यांची भारतीय युवक काँग्रेसच्या नॅशनल मीडिया पॅनलिस्टपदी तसेच ‘यंग इंडिया के बोल – सीजन ४’ साठी गोवा राज्याच्या प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी डॉ. सुलक्षणा धर म्हणाल्या की, “सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाची मी सदस्य असल्याचा मला खूप अभिमान वाटतो; कारण पंचवीस वर्षांहून अधिक काळ या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून यश संपादन केले आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील सुमारे २६००० पुस्तकं असलेले समृद्ध ग्रंथालय, अद्ययावत अभ्यासिका, शांत वातावरण यामुळे वाचक पुस्तकाशी लगेच समरस होतो!”
राम राजमाने पुढे म्हणाले की, “स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे येथील विद्यार्थी खूप नशीबवान आहेत. त्यांना पुस्तकांसह अभ्यासासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. अलीकडे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमधील यशाची टक्केवारी वाढली आहे, ही स्तुत्य बाब आहे!”

दीपप्रज्वलन आणि सरस्वतीपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविकातून, “आपण थोडा वेळसुद्धा दुर्गंधी सहन करू शकत नाही. अशावेळी स्वच्छता कर्मचारी दररोज निष्ठापूर्वक आपले कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे ते सन्मानास पात्र आहेत!” अशी भावना व्यक्त केली.

वर्षा बोरसे आणि ग्रंथालयातील कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. गौरव चौधरी यांनी आभार मानले.