छत्रपती संभाजीनगर,दि.०७(पीसीबी) – बागेश्वर धाम बाबा यांनी मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची टिप्पणी केली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर धाम बाबांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बागेश्वर धाम बाबा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी मराठा आरक्षणाविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी म्हटले की, मला मनातील गोष्ट वाचता येणे हा एक वेगळा विषय आहे. अधिकारांची गोष्ट करणे, हा एक वेगळा विषय आहे. भारत जेव्हा संकटात होता, तेव्हा आपल्या शौर्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या जमातीला आरक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. सरकारने त्यांच्याशी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे मत बागेश्वर धाम बाबा यांनी व्यक्त केले.अयोध्यानगरी मैदानात सोमवारपासून बागेश्वर धाम रामकथा कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, त्याची सुरुवात वेधक कलश यात्रेने झाली. क्रांतीचौकातून दुपारी निघालेल्या कलश यात्रेत मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी झाले होते. यात महिला; तसेच मुलांचा लक्षणीय सहभाग होता. ‘जय श्रीराम’च्या जयघोषात आणि विविध भक्तीगीतांमध्ये ही मिरवणूक हळूहळू अयोध्यानगरीकडे झेपावली.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड व इतर मंडळींच्या उपस्थितीत शहरातील क्रांतीचौकातून दुपारी एकच्या सुमारास कलश यात्रेला सुरुवात झाली. खास वेशभूषेत व डोक्यावर कलश घेऊन आणि माथ्यावर ‘जय श्रीराम’चा टिळा लावलेल्या महिला या यात्रेत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. शिवाय केशरी धोतर-उपकरणे अंगावर घेतलेली मुलेही यात्रेत सहभागी झाली होती आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. खास रथावर आरुढ झालेले भगवान श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमानाचे सजीव देखावे हेदेखील यात्रेचे आकर्षण होते. भगव्या पताका हाती घेतलेले आणि ओठी श्रीरामाचा जयषोघ जपत असंख्य भाविक या लांबलचक यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
दरम्यान या यात्रेत शहरवासीय होतेच; शिवाय बाहेरगावच्या भाविकांची संख्याही लक्षणीय होती. वाजत-गाजत निघालेली ही यात्रा हळूहळू अयोध्यानगरीकडे झेपावत असतानाच, भाविकांना पाण्याची सोय ठिकठिकाणी करण्यात आल्याचेही दिसून आले. चोख पोलिस बंदोबस्त व नियोजनामुळे वाहतुकीची समस्या फारशी निर्माण झाली नसल्याचेही दिसून आले. यात्रेत खास उज्जैनहून डमरुवादक आले होते, तर ओरिसातून शंखवादक आले होते. डमरुवादन आणि शंखनादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेच; शिवाय यात्रेत उत्साह संचारल्याचे पावलोपावली दिसून आले.