पुणे,दि.०६(पीसीबी) – ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. आज या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये राज्यात भाजप हा पुन्हा नंबर १ चा पक्ष ठरला आहे. भाजपपाठोपाठ अजित पवार गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. बारामती तालुक्यातही अजित पवार गटाने आपला दरारा कायम ठेवत सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. दुसरीकडे भाजपने सुद्धा बारामतीतील दोन ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर राज्यात पहिल्यांदाच निवडणुका झाल्या. बारामती ग्रामपंचायतीत अजित पवार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकींकडे लागलं होतं.
बारामतीत अजित पवार गटाने ३२ पैकी २७ ग्रामपंचायतीवर विजय खेचून आणला आहे. भोंडवेवाडी, म्हसोबानगर पवई माळ, आंबी बुद्रुक, पानसरे वाडी, गाडीखेल, जराडवाडी, करंजे, कुतवळवाडी दंडवाडी, मगरवाडी, निंबोडी, साबळेवाडी, उंडवडी कप, काळखैरेवाडी, चौधरवाडी, वंजारवाडी, चांदगुडेवाडी या गावात अजित पवारांचा गट विजयी झाला आहे. दुसरीकडे बारामती तालुक्यात भाजपचा पहिला सरपंच विजयी झाला आहे. चांदगुडेवाडी येथील ग्रामपंचायतीवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. बारामती पाठोपाठ अजित पवार गटाने शिरूर तालुक्यात देखील वर्चस्व मिळवलं आहे. सर्वांत मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या रांजणगाव ग्रामपंचायतवरती अजित पवार गटाने वर्चस्व मिळवलं आहे.
दरम्यान रांजणगाव ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाने १३ जागा जिंकल्या आहेत. याशिवाय सरपंच पदाच्या जागेवरही मोठा विजय मिळवला आहे. दुसरीकडे शरद पवार गटाला शिरुरमध्ये फक्त ३ जागा जिंकता आल्या आहेत. शिरुरसारखी मोठी ग्रामपंचायत हातातून गेल्याने शरद पवार गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.