आता ५ टक्के आरक्षणासाठी मुस्लिम समाज आक्रमक; पुकारला एल्गार!

0
190

-मुस्लिमांनो, फूट पडू देऊ नका! : हुसेन दलवाई यांचे आवाहन

चिपळूण, दि. १ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्य सरकारच्या तोंडाला फेस आला आहे तोच आता ओबीसी तसेच मुस्लिमांनीही आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे.

मुस्लिम समाजाला शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण मिळावे यासाठी काँग्रेसचे माजी खासदार आणि मौलाना आझाद विचारमंचचे अध्यक्ष हुसैन दलवाई यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. मराठा आणि धनगर समाज आक्रमक झाला असतानाच आता मुस्लिम समाजानेही आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी मुस्लिम समाजाने केली आहे.

याबाबत माहिती देताना दलवाई म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजेच; मात्र ओबीसीमधून न देता त्यांना स्वतंत्र मिळावे, अशी मागणी करतानाच मुस्लिम समाजाची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज जागरूक झाला आहे. देशात मुस्लिम समाजावर अत्याचार वाढत आहेत. गेले चार महिने मी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन समाजामध्ये जनजागृती करत आहे.

मुस्लिम समाजामध्ये मागासलेपणा जास्त आहे. सरकारी नोकऱ्या तसेच खासगी नोकऱ्यांतही प्रमाण दोन ते अडीच टक्के आहे. मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांना पुरेसा निधी दिला जात नाही. त्या संस्था बंद पडू लागल्या आहेत. त्यांना पुरेसा निधी देऊन त्या संस्थांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. मुस्लिमांनाही पाच टक्के आरक्षण मिळावे, अशी आमची मागणी आहे.

मुस्लिम समाजाच्या मागण्या

  • केंद्र आणि राज्याच्या अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करा.
  • पंतप्रधान १५ कलमी कार्यक्रमाची कृतिशील अंमलबजावणी करा.
  • मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत शंभर टक्के शिष्यवृत्ती द्या.
  • जिल्हानिहाय मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी सरकारी वसतिगृहाची सोय करा.
  • मॉब लिंचिंग थांबवा. पीडितांना नुकसान भरपाई द्या.
  • राजकीय क्षेत्रात मुस्लिमांना योग्य प्रतिनिधित्व द्या.
  • सर्व जाती-जमातींची जातनिहाय गणना करा.