गाडी फोडल्यानंतर आता हसन मुश्रीफ यांच्या घराचे संरक्षण वाढवले

0
140

मुंबई, दि. १ (पीसीबी) – मराठा आरक्षणाची झळ आता मंत्र्यांर्यंत पोहोचली आहे. राज्यभरात संतप्त आंदोलकांकडून आमदार, खासदार, मंत्र्यांच्या वाहनांची व घराची तोडफोड केली जात आहे. त्यामुळे राज्यात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबईत आमदार निवासासमोर गाडीची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी कागल येथील राहत्या बंगल्याचा बंदोबस्त वाढवला आहे. अज्ञात व्यक्तीने वाहनाची तोडफोड केल्याचे सकाळी समोर आल्यानंतर संतापाचे वातावरण तयार झाले आहे. खबरदारी म्हणून कोल्हापूर पोलिसांनी मंत्री मुश्रीफ यांच्या घरासमोर सुरक्षेत वाढ केली आहे.

राज्यात मराठा समाज आक्रमक होत असताना जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात बांधव आक्रमक होत असताना गाव खेड्यापर्यंत त्याचे लोण पसरले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबई येथे आमदार निवासासमोर गाडी फोडल्यानंतर जिल्ह्यातील कागल येथे राहत्या घरी त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. घरासमोर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून, पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलिस उपाधीक्षक संकेत गिरी गोसावी हे मंत्री मुश्रीफ यांच्या घरी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

चंद्रकांत पाटलांच्या घरी बंदोबस्त वाढवला
मराठा आरक्षणावरून मराठा बांधव आक्रमक झाल्यानंतर खासदार आणि आमदारांच्या घरांना टार्गेट केले जात आहे, तर अनेक पक्षांच्या कार्यालयाला आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनीदेखील खबरदारी घेतली असून, राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संभाजीनगर येथील घरी सुरक्षेत वाढ केली असून, पोलिसांचा बंदोबस्त ठेवलेला आहे.