मराठा आरक्षणासाठी आत्महत्या सुरुच, पंढरपुरातील तरुणाने घेतला गळफास

0
173

पंढरपूर, दि. १ (पीसीबी) – मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाच्या आठव्या दिवशीही जिल्ह्यात आंदोलनाची धग वाढतच आहे. सलग दुसऱ्या दिवशी मराठा समाजाच्या युवकांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी महामार्गांवर रास्ता रोको, टायर पेटवून देऊन राज्य सरकारचा निषेध केला. शेटेवस्ती येथे लोहमार्गावरही टायर पेटवून रेल्वे रोखण्यात आली. दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी दोन तरुणांनी गळफास घेतल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी एका दिव्यांग तरुणाने जीव संपविला आहे. पंढरपूर तालुक्यातील ३० वर्षीय दिव्यांग तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे‌. ही घटना तालुक्यातील तारापूर येथे काल(मंगळवार) पहाटेच्या सुमारास घडली. विलास कृष्णा क्षीरसागर, असे या तरुणाचे नाव आहे.

आंतरवाली-सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा मंगळवारी सातवा दिवस होता. त्यांना समर्थन देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून योग्य तोडगा न निघाल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. मंगळवारीदेखील जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्त्यावर टायर पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला.

पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील विलास क्षीरसागर हा मराठा आंदोलनामध्ये मागील काही दिवसांपासून सक्रिय होता. सोमवारी रात्री अकरा वाजेपर्यंत तो आंदोलनस्थळी बसून होता. दरम्यान, रात्रीत त्याने जवळच असलेल्या करंजीच्या झाडाला भगव्या शालीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरल्यानंतर मराठा समाज बांधवांनी मोठी गर्दी केली.

विलास क्षीरसागर याच्या आत्महत्येमुळे संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या तरुणांनी तारापूर चौकात चार तास ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही , अशी आंदोलकांनी भूमिका घेतली होती. तहसीलदार सुशील बेल्हेकर आणि पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील हे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मराठा समाज आंदोलकांबरोबरच चर्चा करून सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचे आव्हान केले. यावेळी मराठा समाजाच्या वतीने विलास क्षीरसागर याच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना दिले.

संगमनेर, संभाजीनगरला दोन युवकांची आत्महत्या –
मराठा आरक्षणासाठी आणखी दोन तरूणांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. संगमनेर तालुकत्यातील एका तरूणानं आत्महत्या केली आहे. घराच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सागर वाळे असं या तरूणाच नाव होतं. त्याचं वय २५ होतं. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. ‘आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा’, आरक्षण नाही त्यामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यानं सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे.
तर दुसरी घटना छत्रपती संभाजीनगर घडली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पोखरी गावातील एका तरुणान मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची माहिती समोर येतं आहे. शुभम अशोक गाडेकर रा. कोलठान यान गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.पोखरी शिवारात त्यानं मराठा आरक्षणासाठी झाडाला गळफास घेऊन २३ वर्षीय तरूणानं आत्महत्या केली आहे. शुभम हा एमपीएससी या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. या दोघांच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातं आहे.