चांदा ते बांदा मोर्चे, राजीनामास्त्र, नेत्यांना बंदी, काळे झेंडे

0
170

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – मराठा समाजाचे नेते म्हणून जरांगे आणि दुसऱ्यांदा मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारल्यानंतर आता राज्यभरातून मराठा आरक्षणासाठी अक्षरशः वणवा पेटला आहे. राज्यभरामध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चे, राजीनामास्त्र, नेत्यांना बंदी त्याचबरोबर काळे झेंडे दाखवणे हा चांदा ते बांदा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारला आता यावर तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे. राज्यभरामध्ये सकल मराठा समाज त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चा, विविध सामाजिक संघटनांकडून आता मराठा आरक्षणासाठी वज्रमुठ आवळण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न आता दिवसागणिक राज्यांमध्ये गंभीर होत चालला आहे.

आज सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मराठा समाजाच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर सांगलीमध्ये सुद्धा आज सर्वपक्षीय आमदार, खासदार एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. दरम्यान, कराडमध्ये होत असलेल्या मोर्चाला कराड आणि संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाजातील बांधव येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. या मोर्चासाठी गावोगावी जनजागृती सुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने मराठा समाज मोर्चाला उपस्थित राहतील असा दावा करण्यात येत आहे. मोर्चाने मराठा समाजाकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.

दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये सुद्धा मराठा आरक्षणासाठी आता ठिणगी पडली आहे. कोल्हापुरात दसरा चौकामध्ये साखळी उपोषणाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर मराठा समाजातील कार्यकर्तेही मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. मराठवाड्यामध्ये सुद्धा मोठा वणवा पेटला असून राजीनामास्त्र सुरू आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांना सुद्धा आता याचे फटके बसू लागले आहेत. बीडमध्ये ठाकरे गटाच्या 36 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती बिकट होत चालली आहे. मराठा आरक्षणासाठी आता गावोगावी सुद्धा एल्गार सुरू झाला आहे. अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना बंदी सुरू असतानाच राजीनामे सुद्धा पडू लागले आहेत. माढा तालुक्यातील राजनी भिमानगर ग्रामपंचायत सरपंच चंचला विजय पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरपंचपदाचा राजीनामा दिला आहे