विनापरवाना ज्वलनशील पदार्थांची वाहतूक; एकास अटक

0
326

देहूरोड, दि. २९ (पीसीबी) -विनापरवाना धोकादायकपणे ज्वलनशील पदार्थांची वाहतूक केल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २८) सकाळी देहूरोड एक्झिट किवळे येथे करण्यात आली.

दिपचंद्र धनंजय प्रजापती (वय ३५, रा. तुर्भे एमआयडीसी, जि. ठाणे. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह हृदयनारायण सुबेन्द्र सिंग (वय ५०, रा. ठाणे), रामनारायण सुबेन्द्र सिंग (वय ५५, रा. ठाणे), प्रवीण (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर देहूरोड पोलिसांनी एक टॅंकर पकडला. ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या या टॅंकर चालकाने कोणतीही खबरदारी न घेता धोकादायकपणे वाहतूक केली असल्याने त्याच्यावर सुरुवातीला कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडे ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करण्यासाठी कोणताही परवाना नसल्याचे उघडकीस आले. ओर्पी हृदयनारायण सिंग आणि रामनारायण सिंग यांच्या सांगण्यावरून प्रवीण याने डीझेलजन्य ज्वलनशील पदार्थ भरून दिला असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.