धक्कादायक…! सकाळी लवकर उठत नाही म्हणून १२ विद्यार्थ्यांना गरम चमचाने दिले चटके

0
327

गुजरात,दि.२८(पीसीबी) – एक भयानक प्रकार गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात घडला आहे. तेथील एका निवासी शाळेतील व्यवस्थापकाचे क्रूर कृत्य उघडकीस आलं आहे. त्याने सकाळी लवकर उठत नाही म्हणून 12 विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्टीलच्या गरम चमच्याने चटका दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढचं नव्हे तर आता तुम्ही लवकर उठला नाही तर तुम्हाला आणखी शिक्षा होईल, असे व्यवस्थापकाने त्या मुलांना दरडावून सांगितलं. दोन महिन्यांपूर्वी घडलेला हा निर्घृण शिक्षेचा प्रकार आत्ता उघडकीस आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

साबरकांठा जिल्ह्यात नचिकेता विद्या संस्थेच्या नावाने एक निवासी शाळा आहे. मात्र,या शाळेची अधिकृत नोंदणी झालेली नाही. या शाळेतील एका १० वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या वडिलांनी या शाळेचे व्यवस्थापक रणजित सोळंकी यांच्याविरुद्ध खेरोज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुमारे दोन महिन्यांपूर्वी रणजीत सोळंकी याने 11 विद्यार्थ्यांना स्टीलच्या गरम चमच्याने चटका दिला, असा आरोप रामाभाई यांनी केला. एवढंच नव्हे तर रणजीत सोळंकी हा विद्यार्थ्यांना रोज धमकवायचा, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले.

विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तपास केला. त्या तपासात ही शाळा नसून नोंदणीकृत नसलेले गुरुकुल असल्याचे समोर आले आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना उपनिषद, रामायण आणि वेद शिकवण्यासाठी ट्रस्टद्वारे वसतिगृहाची सुविधा चालवली जाते, असे याप्रकरणी डेप्युटी SP स्मित गोहिल यांनी सांगितले. पीडित विद्यार्थ्याचे वडील रामाभाई तराल यांच्या तक्रारीनुसार, सकाळी लवकर न उठल्याबद्दल रामाभाई यांचा मुलगा आणि अन्य ११ अल्पवयीन मुलांना रणजीत सोळंकी हा ओरडला.

त्या निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा छळ केला जातो, अशी माहिती मला आठवड्याभरापूर्वी मिळाली. त्यामध्ये खरंच काही तथ्य आहे का हे तपासण्यासाठी मी काही दिवसांपूर्वीच शाळेत गेलो होतो. माझ्या मुलाच्या पायावर जळाल्याचे डाग, व्रण दिसत होते पण भीतीपायी तो काहीच बोलला नाही, त्याने तोंडच उघडल नाही. नंतर काही दिवसांनी त्याने मला सांगितलं की सुमारे दोन महिन्यांपूर्वी आम्ही लवकर उठलो नाही म्हणून रणजीत सोळंकी आम्हाला ओरडले होते, असं रामाभाई म्हणाले.

विद्यार्थी लवकर उठले नाहीत म्हणून रणजीत याने शिक्षा म्हणून एकामागून एक असे १२ विद्यार्थ्यांना गरम चमच्याने चटका दिला होता. पण या घटनेमुळे विद्यार्थी एवढे घाबरले होते की त्यांनी त्यांच्या पालकांसमोर तोंडच उघडलं नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.