दांडिया खेळताना चुकून दांडी लागल्याने अल्पवयीन मुलास बेदम मारहाण

0
5413

चिखली, दि. २३ (पीसीबी) – दांडिया खेळताना चुकून दांडी लागल्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. २१) सायंकाळी पावणे सात वाजता ओंकारनगर चौक, जाधववाडी, चिखली) येथे घडली.

आदित्य उर्फ डापक्या, विशाल पवळे, गणेश कोठावळे (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. ओंकारनगर, जाधववाडी, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अल्पवयीन मुलाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ओंकारनगर चौकात दांडिया खेळत असताना त्यांच्या तोंडओळखीची मुले आरोपी यांना चुकून दांडी लागली. त्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादी यांच्या तोंडावर, डोळ्यावर हाताने मारहाण केली. आरोपी गणेश याने सिमेंटच्या ब्लॉकने फिर्यादीच्या डोक्यात, कानावर, गालावर मारून गंभीर जखमी केले. ‘जर तू आमच्या नादाला लागला तर तुला मारून टाकू’ अशी आरोपींनी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.