दिवंगत नगरसेवक जावेद शेख स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
पिंपरी दि.२१ (प्रतिनिधी) – आकुर्डीतील संत तुकाराम महाराज पालखी तळासहीत प्रभागातील इतर रस्त्यांचेही नूतनीकरण व सुशोभीकरण करावे तसेच आकुर्डीतील उर्दू माध्यमिक शाळेतील विज्ञान शाखेच्या इमारतीचे नव्याने नुतनीकरण करण्याची मागणी दिवंगत नगरसेवक जावेद शेख स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने तौहिद जावेद शेख आणि इखलास सय्यद यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
दिवंगत नगरसेवक जावेद शेख स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने अजितदादांना दिलेल्या निवेदनात असे म्हणले आहे की, “आकुर्डी प्रभाग क्र.१४ या प्रभागामध्ये काही विकासकामांचा अंदाजपत्रकात समावेश असूनही मागिल तीन वर्षात विकासकामे झालेली नाहीत.
विशेषत,
१) संत तुकाराम महाराज पालखीतळाचे सुशोभिकरण
२) संत तुकाराम महाराज पालखीतळ ते आकुर्डी- खंडोबा चौक या पालखी मार्गाचे सुशोभिकरण
३) लोकमान्य हॉस्पिटल ते म्हाळसाकांत महाविद्यालय चौक या पालखीतळाला समांतर असलेल्या रस्त्याचे सुशोभिकरण
४) महापालिकेच्या आकुर्डी येथील उर्दू माध्यमिक शाळेतील विज्ञान शाखेच्या इमारतीचे नव्याने नुतनीकरण करणे.
सदर उपरोक्त विकास कामांसाठी दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांनी ०३/०१/ २०२० मध्ये पत्र देऊन सन २०२० – २०२१ च्या अंदाजपत्रकात समाविष्ट करण्याचे कळविले होते. त्या अनुषंगाने महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयातील दि. ०९ जाने २०२० च्या सभावृतांत सदर विषय मंजुर करण्यात आले, तरीही अद्याप पुर्तता झाली नाही
त्यानंतर आम्ही २४ एप्रिल २०२१ च्या जनसंवाद सभेत सदर प्रश्न उपस्थित केल्यानंतर, पुरेशी तरतूद उपलब्ध झाल्यानंतर विकासकामे सुरू करण्यात येतील या आशयाचे पत्र २९ एप्रिल २०२३ रोजी आम्हाला देण्यात आले.
आकुर्डी भागात दरवर्षी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असतो, राज्यातील लाखो वारकरी व भाविक भक्त आकुर्डीतील याठिकाणी भक्तीभावाने येत असतात, सदर पालखी लोकमान्य टिळक चौक ते आकुर्डी विठ्ठल मंदिर व पुढे खंडोबा मंदिर चौक मार्गे पुण्याच्या दिशेने रवाना होते, सदर सोहळा हा वारकरी व विठ्ठलभक्तांच्या जिव्हाळ्याचा असून वारकरी, दिंडीकरी, भक्तांना मूलभूत सुविधा देणे महापालिकेचे कर्तव्य असून ही केवळ दुर्लक्षापणामुळे विकास खुंटला आहे.
त्याच बरोबर आकुर्डी उर्दू माध्यमिक शाळेतील विज्ञान शाखेच्या इमारतीचे नुतनीकरण हा विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या व पालकांच्या भावनेचा विषय आहे असे असूनही निधी अभावी विकास थांबला आहे. सदर दोन्ही बाबी आपल्या निदर्शनात याव्यात. म्हणून सदरचे पत्र आपणांस देत आहे तरी आपण यात लक्ष घालुन हा प्रश्न तातडीने सोडवून सर्व कामे मार्गी लावावीत” असे त्यात नमुद केले आहे.