तळेगाव, दि. २० (पीसीबी) – अडीच वर्षांच्या चिमुकल्याला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यातून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. वडिलांनी प्रसंगावधान राखत नागरिकांच्या मदतीने तरुणाला पकडले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलाला पळवून नेणाऱ्यास अटक केली. ही घटना गुरुवारी (दि. 19) दुपारी पावणे दोन वाजता तळेगाव स्टेशन येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर घडली.
मनीषकुमार बिनोद दास (वय 27, रा. सुरसंड, सीतामढी, बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चिमुकल्याच्या आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांचे पती आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला घेऊन तळेगाव स्टेशन येथील महाराष्ट्र बँकेत आले होते. दोघे पती पत्नी बँकेच्या व्यवहारात व्यस्त असताना त्यांचा मुलगा बाजूलाच खेळत होता. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी दास याने चिमुकल्याला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आपल्या मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्ती घेऊन जात असल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांच्या पतीने आरडओरडा करून दास याला पकडले. त्यानंतर पोलिसांना माहिती देऊन दास याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दास याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.