थरारक! कॅफेला आग लागताच जीव वाचविण्यासाठी तरुणाची चौथ्या मजल्यावरून उडी

0
559

देश, दि. १९ (पीसीबी) – कर्नाटकची राजधानी बंगळुरुतील एका कॅफेत भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरमंगला भागातील एका हुक्का बारमध्ये आग लागली असून त्यात कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती बंगळुरु पोलिसांनी दिली आहे. या घटनेत मोठी वित्तहानी झाली असून संपूर्ण इमारत जळून खाक झाली आहे. अशातच आता या घटनेसंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आग लागलेल्या इमारतीतून जीव वाचवण्यासाठी एका व्यक्तीने चक्क चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली आहे. यामध्ये संबंधित तरुणाला गंभीर मार लागला असून त्याचा जीव वाचला आहे.

बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बंगळुरुतील कोरमंगलातल्या एका हुक्का बारला अचानक भीषण आग लागली. त्यामुळं हुक्का बारमध्ये बसलेल्या लोकांनी जीवाच्या आकांताने बाहेर पळण्यास सुरुवात केली. अशातच एक व्यक्ती इमारतीच्या चौथ्या मजल्यावर बसलेला होता. आग लागल्याचं समजताच तो प्रचंड घाबरला. परंतु जीव वाचवण्यासाठी समोर कोणताच पर्याय नसल्याने तरुणाने थेट चौथ्या मजल्यावरून खाली उडी टाकली. त्यात त्याला मार लागला असून तो बालंबाल वाचल्याची माहिती बंगळुरू पोलिसांनी दिली आहे.

बंगळुरुतील आगीच्या घटनेचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु हुक्का बारमध्ये गॅस गळती झाल्यामुळं आग लागल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. इमारतीतून खाली उडी टाकलेल्या व्यक्तीला पोलिसांनी उपचारासाठी टिळकनगर येथील केजी रुग्णालयात हलवलं आहे. याशिवाय घटनेच्या काही मिनिटांतच अग्निशामन दलाचे जवान आणि पोलीस कॅफेत दाखल झालं. त्यानंतर मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. आगीच्या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.