बारामतीतून पार्थ पवार लढणार ही केवळ चर्चा – रोहित पवार

0
360

पिंपरी,दि.१७(पीसीबी) – बारामती लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची केवळ चर्चा आहे. अशीच चर्चा नागपूरमध्येही आहे. तिथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. गडकरी वगळता भाजपच्या उमेदवाराचा पराभव होईल अशी तिथे चर्चा असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीच्या प्रश्नाला बगल दिली.

पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर आझमभाई पानसरे, प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, काशिनाथ नखाते आदी उपस्थित होते. कोणाचे पालकमंत्रीपद काढले आणि कोणाला दिले यावरून भाजपमधील संघर्ष दिसतो असे सांगत आमदार रोहित पवार म्हणाले, लोकांतील लोक कधी दबावतंत्राला घाबरत नाही. घाबरलेले तिकडे गेले आहेत. तिकडे गेलेले काही लोक संपर्कात आहेत. तेथील अनेकांची चलबिचल चालली आहे. त्यांच्यात अस्वस्थता आहे. ते लवकरच आमच्याकडे येतील. भाजप लोकनेत्याला संपविण्याचा प्रयत्न करत आहे.

कंत्राटी नोकरभरती, अवाजवी परीक्षा शुल्क, पेपरफुटी, शाळा दत्तक योजना या विरोधात 25 ऑक्टोबरपासून युवा संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. 25 तारखेला तुळापूर येथून 800 किलोमीटर पायी पदयात्रेला सुरुवात होईल. 45 दिवस 830 गावे, दहा जिल्हे 28 तालुके असा यात्रेचा प्रवास असणार आहे. 200 लोक यात्रेत चालणार आहोत. दिवाळी यात्रेतच साजरी करणार आहे. युवक, त्यांच्या पालकांना खूप सोसावे लागत आहे.

अभियंता झाले, स्पर्धा परीक्षा दिली पण नोकरी नाही. विद्यार्थी, पालकांचा संघर्ष सुरू आहे. शाळा दत्तक योजना खासगीकरणाची पहिली पायरी आहे. समूह शाळा योजना बंद करू नये, आदिवासी पाडे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. कंत्राटी भरतीत एका तलाठी पदासाठी 22 ते 23 लाख रुपये मागितले जात आहेत. पैसे भरून अधिकारी होणारा कधीही जनतेची कामे प्रामाणिकपणे करू शकत नाही. पदवी मिळाली तर नोकरी मिळत नाही. त्यासाठी युवा आयोग झाला पाहिजे.

नोकरी नसलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज माफ करावे. ही यात्रा अराजकीय आहे. 830 गावात मुक्काम करणार आहोत. काही गावात भाजपचे सरपंच आहेत. त्यातील 30 गावातील सरपंच यांनी आम्हाला पाठींबा दिला आहे. लोकांचे प्रश्न आम्ही आवाज उठवत आहेत. सर्वांना पत्र दिले आहे. कोणीही यात्रेत सहभागी होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

शहरात महाराष्ट्रातील लोक राहत आहेत. आतापर्यंत ४० हजार युवकांनी नोंदणी केली आहे. संघर्ष करण्याची आमची भूमिका आहे. ८३० गावात मुक्काम करणार आहोत. काही गावात भाजपचे सरपंच आहेत. त्यातील ३० गावातील सरपंच यांनी आम्हाला पाठींबा दिला आहे. लोकांचे प्रश्न आम्ही आवाज उठवत आहेत. सर्वांना पत्र दिले आहे. कोणीही यात्रेत सहभागी होऊ शकतो.