रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक मागतात २५ टक्के कमिशन

0
274

पुणे, दि. १३ (पीसीबी) – पूर्ण केलेल्या रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक पंचवीस टक्के कमिशन मागतात, या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे पत्र ठेकदाराने व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील टाकवे ग्रामपंचायतीत हा प्रकार घडला आहे. बहुतांश ग्रामपंचायतीत अशा प्रकारे टक्केवारी घेतली जाते असेही ठेकेदारांनी सांगितले..

टाकवे ग्रामपंचायत हद्दीत पंधराव्या वित्त आयोगानुसार ड्रेनेजलाइन रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याचे काम अक्षय राठोड यांना दिले होते. त्यांनी हे काम ठेकेदार महेश आढे यांना दिले. त्यांनी हे काम पूर्ण केले आहे. या कामाचे बिल काढण्यासाठी ठेकेदार आढे तीन महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र, बिलाच्या रकमेतील पंचवीस टक्के रक्कम सरपंच व ग्रामपंचायत मागत असल्याने या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेत सरपंच व ग्रामसेवक यांच्या नावाने सुसाइड नोट व्हायरल केली आहे.

आत्महत्येला सरपंच व ग्रामसेवक जबाबदार राहतील, असे या पत्रात महेश आढे यांनी नमूद केले आहे. या सुसाइड नोटमुळे टाकवे ग्रामपंचायत व परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. टक्केवारी घेणे म्हणजे गावातल्या विकास खुंटतो होय. आपल्या गावाचा विकास कसा होईल? याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे, असे ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामसेवक आणि सरपंच यांनी लाच घेतली नसेल, तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही, त्यांनी लगेच प्रसारमाध्यमांकडे यायला पाहिजे होते. या सर्व प्रकरणाच्या चौकशीची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.