अजित पवार मुख्यमंत्री हे स्वप्नच राहणार – शरद पवार

0
148

अकोला, दि. १२ (पीसीबी) : अजित पवार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत हे काही आता लपून राहिलेलं नाही. त्यांना पूरक अशी भूमिकाही युतीसरकारमधील अनेक नेत्यांनी वारंवार घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी यावर भाष्य करताना एक प्रकारे अजित पवार यांची खिल्लीच उडवली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार असं त्यांनी म्हटलं आहे.

अकोला इथं सहकार महर्षी अण्णासाहेब कोरपे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमासाठी तसेच सहकार महामेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली.
अजित पवारांना पूर्ण पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करु अशा आशयाचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, आमचा आग्रह हाच असणार आहे की आम्ही तीन पक्ष एकत्र राहणार आहोत. (Marathi Tajya Batmya)

राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या सर्वाचं उद्या राज्य यावं यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. जनमानसात आम्ही जो प्रतिसाद पाहतो आहोत. त्याचं जर मतांमध्ये परिवर्तीत झालं तर या तीन पक्षांचं राज्य येऊ शकतं. यामध्ये आणखी काही पक्ष सहभागी होतील. उदाहरणार्थ शेतकरी कामगार पक्ष या सर्वांशी आम्ही बोलू.
“अजितदादा जर मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या गळ्यात पहिला हार घालणारी मी असेन कारण बहिण म्हणून माझ्या त्याच्यावर जास्त हक्क आहे” असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. यावरही पत्रकारांनी विचारल्यानंतर पवार म्हणाले, “ठीक आहे, पण हे एक स्पप्न आहे. ही काही घडणारी गोष्ट नाही” यावरुन त्यांनी अजित पवारांना टोला लगावत त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्नच राहणार आहे, असं ते म्हणाले.