चाकण , दि. ११ (पीसीबी) – धोकादायकपणे मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरी केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी एका व्यक्तीवर कारवाई केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 10) सायंकाळी आंबेठाण रोड, चाकण येथे करण्यात आली.
ज्ञानेश्वर ममता हुलवळे (वय 68, रा. आंबेठाण रोड, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार दत्ता पाषाणकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर हा बेकायदेशीररित्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता व्यावसायिक गॅस सिलेंडर मधून घरगुती गॅस सिलेंडर मध्ये गॅस भरत होता. यावेळी धक्कादायक बाब म्हणजे हा सारा प्रकार पेट्रोल पंपाच्या जवळ सुरू होता. आपण करत असलेल्या कामाने जीवितास धोका होईल याची जाणीव असताना देखील हे काम सुरू होते. कोणत्याही कायदेशीर अधिकाराशिवाय हा प्रकार केल्याप्रकरणी आरोपीवर जीवनावश्यक वस्तू कायदा व पुरवठा व वितरण नियम आदेश 2000 चे कलम 3,4,5,6,7 यांच्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अद्याप आरोपीला अटक केली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.










































