उध्दव ठाकरेंना शिवाजी पार्क, एकनाथ शिंदेंचे वांदे

0
223

मुंबई ,दि. १० (पीसीबी) – स्थापनेपासून शिवाजी पार्क अन् शिवसेनेचे अतूट नाते आहे. मात्र पक्षात फूट पडल्यानंतर या मैदानावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वाद सुरू झाला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरून वाद पेटला होता. या वादातून आता शिंदे गटाने माघार घेतल्याने शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळाव पार पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आता शिंदे गटाने त्यांच्या मेळाव्यासाठी मैदानांची चाचपणी सुरू केली आहे.

गेल्या वर्षी शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर झाला होता. यंदा शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी क्रॉस मैदान किंवा ओव्हल मैदानाची चाचपणी सुरू असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले आहे. शिवाजी पार्कच्या वादावर केसरकर म्हणाले, ‘आमचा दसरा मेळावा क्रॉस किंवा ओव्हल मैदानावर होणार आहे. आम्हाला कुणाशीही भांडायचे नाही. त्यांना सहानुभूतीचे राजकारण करायचे आहे. बाळासाहेबांच्या विचारांपासून ते दूर गेले आहेत. हिंदुत्वाबाबत कुणीही काहीही बोलले तरी ते शांत बसताना दिसत आहेत,’ अशी टीकाही केसरकरांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केली.

दरम्यान, शिवाजी पार्कवरून यंदा वाद निर्माण होऊन तो वाढू नये, यासाठी ठाकरे गटाने सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यांनी महिनाभरापूर्वीच हे मैदान आपल्याला मिळावे यासाठी ठाकरे गटाकडून अर्ज दाखल केला होता. आता या वादातून शिंदे गटाने माघार घेतल्याने शिवाजी पार्क मैदान हे ठाकरे गटाला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता शिंदे गटाचा दसरा मेळा कुठे होणार याकडे राज्याचे लक्ष आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या वर्षी दोन्ही गटांनी (ठाकरे गट-शिंदे गट) मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावे, यासाठी महापालिकेकडे अर्ज केला होता. महापालिकेने कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत दोन्ही पक्षांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळून ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी दिली होती.