पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पुणे येथील गॅस टँकर प्रकरणात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पोलिसांनाच घेरले आहे. गॅस माफियांचा हा हैदोस ससूनमधील ड्रग्स माफियांसारखाच आहे, असा आरोप त्यांनी केला. गॅसच्या या काळाबाजाराला आणि त्यामुळे लागलेल्या भीषण आगीला पिंपरी चिंचवड पोलिसच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप सावंत यांनी केला आहे. सोमवारी तानाजी सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पोलिसांवर आरोप केले. दरम्यान, या प्रकऱणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून टँकर चालक अद्याप फरार आहे.
पुणे शहरातील पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी मध्यरात्री एकापाठोपाठ नऊ ते दहा सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट टँकरमधून गॅस भरला जात असताना झाला. त्यानंतर घटनास्थळावरुन वाहन चालक आणि गॅस भरणारे फरार झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासासाठी पथक तयार केले गेले. या पथकाने तीन जणांना अटक केली आहे. मात्र अजून टँकरचालक फरार आहे. वाकड पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
गॅस चोरी प्रकरणात काही तासांत कारवाई
पुणे येथील ससून रुग्णालयातील आरोपी फरार प्रकरणात पुणे पोलिसांवर टीका होत आहे. ललित पाटील हा रुग्णालयातून पळून गेल्याच्या घटनेस आठ ते दहा दिवस झाले आहे. परंतु अजूनही तो पोलिसांना सापडत नाही. आता पिंपरी चिंचवडमध्ये गॅस चोरी प्रकरण उघड झाले आहे. यामुळे पोलिसांवर पुन्हा टीका होऊ लागली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी घटनेच्या काही तासांत तीन जणांना अटक केली आहे.
गॅस टँकरचा चालक अजूनही फरार
पिंपरी चिंचवडमधील जेएसपीएम संस्थेजवळ गॅस चोरीचा काळाबाजार होत असल्याची घटना उघड झाली. त्यामुळे रविवारी मध्यरात्री एकामागे एक सिलेंडर स्फोट होऊन भीषण आग लागली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असली तरी टँकर चालक अजूनही फरार आहे. मात्र टँकर पार्क करण्यासाठी जागा देणारा मालक, चोरीच्या गॅसची विक्री करणारा आणि अवैधरित्या सिलिंडरची वाहतूक करणारा टेम्पो चालकाचा यात समावेश आहे.