पुणे दि. ६ (पीसीबी) – भारतीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावरील दाव्यांबाबतच्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या एका गटाचे नेतृत्व शरद पवार आणि दुसऱ्या गटाचे नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार करत आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट आणि शरद पवार यांच्यातील वादाच्या दरम्यान अजित पवार यांनी जुलैच्या सुरुवातीला निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हावर दावा केला. त्यानंतर शरद पवार गट देखील आयोगात गेला होता.
अजित पवार गटाने आयोगात गंभीर आरोप केला आहे. शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा आरोप अजित पवार गटाने यावेळी केला. जयंत पाटील यांची राज्य प्रदेशाध्यक्षपदावरील नियुक्ती कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी करण्यात आली, असेही अजित पवार गटाने म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभेतील ५३ पैकी ४३ आमदार आमच्या गटाकडे आहेत. विधान परिषदेतील ९ पैकी ६ आमदारही आमच्या बाजूने आहेत. याशिवाय लोकसभेतील ५ पैकी १ व राज्यसभेतील ४ पैकी १ खासदार आपल्या गटात असल्याचा दावाही अजित पवार गटाने आपल्या युक्तिवादात केला आहे.
अजित पवार यांच्यासह ९ आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारं शरद पवार गटाचं पत्र बेकायदेशीर आहे. मुख्य प्रतोद आमच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या एका पत्राने नियुक्त्या होतात. हा मनमानी पद्धतीचा कारभार आहे. हे लोकशाहीला धरून नाही, असेही अजित पवार गटाने म्हटले आहे.
शरद पवार यांच्या गटाकडून वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. अजित पवार गटाची भूमिका पक्षाच्या विचाराच्या विरोधात आहे. अजित पवार गटाने पक्षाची घटना पाळली नाही, असा यु्क्तीवाद शरद पवार गटाकडून करण्यात आला.
अजित पवार यांच्यासह ९ आमदारांवर कारवाई करण्यासाठी अध्यक्षांकडे पत्र दिले आहे. पक्ष चालवताना पक्षाच्या घटनेनुसार नियुक्त्या झाल्या पाहिजेत. अजित पवार गटाने पक्षाची घटना पाळली नाही. पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी आमच्या बाजून आहे, असे अभिषेक मनू सिंघवी म्हणाले.