पोलिसात तक्रार दिल्याने टोळक्याचा राडा

0
927

दिघी, दि. ०६ (पीसीबी) – पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून चार जणांच्या टोळक्याने कोयते, दगड, काठ्या घेऊन परिसरात गोंधळ घातला. तसेच वाहनांची तोडफोड करत तक्रारदार व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 3) रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास स्वराज कॉलनी, दिघी येथील अष्टविनायक सोसायटीमध्ये घडली.

मनोज श्रीरंग कदम (वय 31, रा. अष्टविनायक सोसायटी, स्वराज कॉलनी, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल वारे, आकाश सोनवणे, राम मोहन देवकाते (वय 20, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), ओमकार विनोद लोयरे (वय 20, रा. लांडेवाडी, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कदम यांनी आरोपींच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांच्या सोसायटीमध्ये येऊन कोयते, ब्लॉक, दगड, विटा, काठी जवळ बाळगून परिसरात दहशत निर्माण केली. फिर्यादी यांच्या गल्लीतील नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केली. शिवीगाळ करून हातात कोयता घेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देत राडा घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी राम देवकाते आणि ओमकार लोयरे या दोघांना अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.