धक्कादायक! म्हशीच्या दीड वर्षाच्या रेडकावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीस अटक

bpcauthor bpcauthor
2 Min Read

पिंपरी, दि.५(पीसीबी)- चिखली परिसरातील जाधववाडी येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका विकृत नराधमाने गोठ्यात बांधलेल्या म्हशीच्या दीड वर्षाच्या रेडकावर अनैसर्गिक अत्याचार केला. गोठ्यात बांधलेले रेडकू पाय बांधलेल्या अवस्थेत सतत दिसत असल्याने गोठा मालकाने गोठ्यात सीसीटीव्ही बसवले असता त्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. हा धक्कादायक प्रकार 18 ऑगस्ट ते दोन ऑक्टोबर या कालावधीत जाधववाडी येथील बोल्हाईचामळा येथे घडला.

रामकिशन श्रीरामभवन चौहाण (वय 24, रा. जाधववाडी, चिखली. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 35 वर्षीय व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराशेजारी जनावरांचा गोठा आहे. त्यांच्या गोठ्यात दोन म्हशी, एक दीड वर्षाच्या रेडकू (पारडी) आणि एक दीड महिन्याचे रेडकू (पारडी) अशी जनावरे आहेत. 18 ऑगस्ट रोजी दीड वर्षीय रेडकू पाय बांधलेल्या अवस्थेत आढळले. रेडकू हालचाल करीत नसल्याने फिर्यादी यांनी जनावरांच्या डॉक्टरांना बोलावून त्यावर उपचार केले. 24 सप्टेंबर रोजी देखील ते रेडकू पाय बांधलेल्या अवस्थेत आढळले. त्याची हालचाल होत नसल्याने पुन्हा फिर्यादी यांनी जनावरांच्या डॉक्टरांना बोलावून त्यावर उपचार केले.

दोन वेळा असा प्रकार घडल्याने फिर्यादी यांनी गोठ्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. दोन ऑक्टोबर रोजी पुन्हा सकाळी ते रेडकू पाय बांधलेल्या अवस्थेत आढळले. त्यावेळी फिर्यादी यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग तपासले. त्यामध्ये एका व्यक्तीने फिर्यादी यांच्या गोठ्यातील संबंधित रेडकावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे समोर आले. त्यानंतर गोठ्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असल्याचे आरोपीच्या लक्षात येताच त्याने गोठ्यातील टॉवेल अंगावर पांघरून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली.

फिर्यादी यांनी सीसीटीव्ही दिसणाऱ्या व्यक्तीचा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून माग काढला असता तो जाधववाडी येथे मिळून आला. पोलिसांच्या मदतीने त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 377 आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article