पुणे,दि.०७(पीसीबी) – डीजे आणि लेझरमुळे अनेकांना बहिरेपण येते, अनेकांची दृष्टी जाते तर काही जणांना प्राण गमवावे लागतात. हे बंद व्हावे यासाठी सकाळमध्ये असताना मी एक लेख सुद्धा लिहला होता. याचे दुष्परिणाम पाहता हे कोठेतरी थांबले पाहिजे असा विचार मी केला. याची सुरुवात पुण्यातून व्हावी यासाठी विचारमंथन करण्यासाठी पुण्यात एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात आंबेडकरी नेते, प्राध्यापक, पत्रकार, डॉक्टर यांनी सहभाग घेतला होता.
आंबेडकरी जनतेचे अजूनही शिक्षण,नोकरी असे विविध प्रश्न सुटलेले नाहीत. अशा परिस्थितीत बाबासाहेबांच्या जयंती निमित्त लोकांना त्रास होईल असे वर्तन करण्यापेक्षा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बाबासाहेब ज्ञानसूर्य होते त्यामुळे त्यांना विचारांनी मानवंदना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी सामुदायिक प्रयत्न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आपल्याशी संबंधित मंडळांमध्ये डीजे आणि लेझरचा वापर या वर्षीपासून बंद करावा, यासाठी पुणे शहरातील विविध मंडळे आणि विहारांना भेट देऊन त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा निर्णय या निमित्ताने घेण्यात आला.
यावेळी माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी यांनी डॉल्बीमुक्त जयंतीसाठी समाजाचे प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले. यासाठी शासकीय पातळीवर यसाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सिद्धार्थ धेंडे यांनी या बैठकीत ससून हॉस्पिटलच्या १०० मिटर परिसरात ही डीजे च्या ठेक्यावर तरुणाई नाचत असते हे दुर्दैवी असल्याचे सांगितले. तसेच लोहगाव विमानतळ परिसरात मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या लेझर किरणांमुळे एखादा मोठा विमान अपघात घडू शकतो अशी भीती व्यक्त केली.
ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी, डीजे मुळे राज्यात ७ तर पुण्यात २ जणांचे मृत्यू झाल्याचे सांगत डीजे आणि लेझर विरुद्धच्या लढ्यात माध्यमांनी अग्रस्थानी राहून व्यापक जनमत तयार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर केशव वाघमारे यांनी, अशाप्रकारे डीजे आणि लेझर मुळे होणारे तोटे तरुण मंडळांना समजावून सांगितले पाहिजे असे मत व्यक्त केले.
या बैठकीत डीजे आणि लेझर बंदीसाठी जनजागृती सह आवश्यक त्या सर्व उपाय योजना करण्याबद्दल निर्णय घेण्यात आला. यासाठी पोलिस आणि प्रशासनाची मदत घेण्याबद्दल एकमत झाले.
माजी आमदार जयदेव गायकवाड, पुण्याचे माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, सवित्रीबाई फुले विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. मनोहर जाधव, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय जाधव, दलित चळवळीचे अभ्यासक केशव वाघमारे, डॉ. पवन सोनवणे, नागपूर विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे विभागप्रमुख डॉ.अविनाश फुलझेले,लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष संजय आल्हाट, माजी सहा. पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, पत्रकार निखिल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गायकवाड, अनिल माने आदींनी या बैठकीत सहभाग घेतला.












































