आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड मधून जाणार दहा हजार मराठे

0
225

मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांची माहिती

पिंपरी,दि.०४(पीसीबी) – राज्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी १४ ऑक्टोंबर रोजी अंतरवली सराटी येथे लाखो मराठा बांधव एकत्र येणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू आहे. या महासभेला पिंपरी चिंचवड शहरातून सुमारे दहा हजार मराठा बांधव घेऊन जाणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी दिली. त्यासाठी वाहतुकीची व्यवस्था देखील करण्यात आल्याचे काळे यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा स्वाभिमानी लढा उभारला आहे. राज्य सरकारमधील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी त्यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली. त्यांनी नुकतेच सुरू केलेल्या दौऱ्याला लाखोंचा पाठिंबा मिळत आहे. राज्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी १४ ऑक्टोंबर रोजी अंतरवली सराटी येथे लाखो मराठा बांधव एकत्र येणार आहेत. या दिवशी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाला एक महिना पुर्ण होत आहे. आणखी दहा दिवसाची मुदत शिल्लक राहणार आहे. त्या दहा दिवसात दिवसात सरकारने आपल्या कामाची गती वाढवावी यासाठी हे भगवे वादळ शांततेच्या मार्गाने धडकणार आहे. या मध्ये मराठा समाज बांधवांच्या नेमक्या भावना काय आहेत, यावर उहापोह होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात बेमुदत उपोषण केले होते. तसेच एक दिवस पिंपरी चिंचवड शहर बंद ठेवण्यात आले होते. त्याला सर्व संघटना मिळून मोठा पाठिंबा मिळाला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबत शहरवासियांची देखील मोठी भावना आहे. त्याचा भाग म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटे येथे भव्य महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या स्वाभिमानी महामेळाव्याला पिंपरी चिंचवड शहरवासीय देखील पाठिंबा देऊन सहभागी होणार आहेत. त्यासाठी शहरातून तब्बल दहा हजार समाज बांधव घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी या 9881030007 नंबरवर संपर्क करा, असे आवाहन काळे यांनी केले आहे.