डॅा.भिमराव यशवंत आंबेडकर यांनी जाहीर केला पिंपरी विधानसभेचा उमेदवार

0
453

मनोज गरबडे यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश

पिंपरी,दि.०३(पीसीबी) – पिंपरी विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही मनोज गरबडे या समता सैनिक दलाच्या सैनिकाची उमेदवारी जाहीर करीत आहोत. पिंपरी विधानसभेत या वेळेस नक्की परिवर्तन घडणार. असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॅा.भिमराव यशवंत आंबेडकर यांनी केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शाई ते लोकशाही या अभियानांतर्गत समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा (पिंपरी चिंचवड युनिट) यांच्या नेतृत्वाखाली या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॅा.भिमराव यशवंत आंबेडकर तसेच मनोज गरबडे हे उपस्थित होते. पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महापुरुषांच्या नावाच्या जयघोषात मोटारसायकल व चारचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्या समाजबांधवांनी हातात निळ्या पताका घेऊन व समता सैनिक दलाच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. सोमवार (दि.०२) शहरातून निघालेल्या भव्य अशा मोटारसायकल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.यामध्ये पुरुषांसह महिलांची संख्यादेखील लक्षणीय होती. या भव्य रॅलीचे चळवळीतील कार्यकर्ते व सर्व समाजातील बांधवांतर्फे  दहा ते पंधरा ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून फुलांच्या वर्षावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

दरम्यान, पिंपरी येथील भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे असणाऱ्या मैदानावर रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॅा.भिमराव यशवंत आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले,देशातील एकंदरीत परिस्थिती पाहता शिक्षण व्यवस्था,आरोग्य व्यवस्था, वाढती अराजकता, बेरोजगारी हे देशाला अधोगतीकडे नेणाऱ्या बाबी आहेत. राजकीय उदासीनता यास कारणीभूत आहे. त्यामुळे परिवर्तनासाठी आपले योगदान महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी निवडणुका लागण्याची शक्यता आहे.त्यासाठी आपण तयार असायला हवे.

‘पिंपरी विधानसभेसाठी आमचा उमेदवार ठरला!’
रॅलीला संबोधित करताना डॅा.भिमराव यशवंत आंबेडकर म्हणाले, समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला आमची संघटना साथ देणार असून मनोज गरबडे या युवकाला पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी देणार आहोत. असे जाहीर करत त्यांनी मनोज गरबडे यांना विधानसभेसाठी तयारी करण्याचे आदेश दिले.

यावेळी प्रमुख उपस्थिती संजय फुलपगारे यांची होती तर आम्रपाली गायकवाड, आकाश इजगज, दिनेश बनसोडे, दिनेश वाघमारे तसेच समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, चळवळीतील पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार राहुल सोनवणे यांनी मानले