शरद पवार यांच्या दौऱ्याने दिलीप वळसेंचे टेन्शन वाढले

0
240

मंचर, दि. २ (पीसीबी) – निवडणुकीला उभं राहिलो. तुमच्या मतावर निवडून आलो आणि पॅनेलच्या विरोधात निवडून आलेल्या लोकांशी जवळीक केली, तर ती जनतेची फसवणूक असते. तशी फसवणूक दुर्दैवाने राज्यात काही ठिकाणी झाली आहे. त्यातून लोक संधी मिळेल तेव्हा योग्य तो निकाल घेतात. ती संधी वर्ष-दीड वर्षात येईल, ती संधी आल्यावर तुम्ही काय करायचं, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता बंडखोरांबाबत एक संदेश दिला आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या दौऱ्यामुळे मंत्री दिलीप वळसे यांचे टेन्शन वाढले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार हे रविवारी (ता. १ ऑक्टोबर) जुन्नरच्या दौऱ्यावर होते. जुन्नरमधील आदिवासी विकास परिषदेनंतर पुण्याला येताना आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम आणि बाळासाहेब बाणखेले यांनी स्वागत केले. या वेळी पवारांसमवेत खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूरचे आमदार अशोक पवार होते. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पवार यांनी बंडखोरांबाबत कोणाचेही नाव न घेता योग्य तो संदेश दिला.

पवार म्हणाले की, आंबेगाव तालुका, तुम्हा सगळ्यांचा आणि माझा एक प्रकारचा वेगळा संबंध आहे. अनेक वर्षे राजकारणात एखाद्यी गोष्ट तुम्ही सांगितली, तर त्याला मी कधीही नाही म्हटलं नाही. त्यामुळे माझा स्वतःचा दृष्टिकोन इथला कुठलाही प्रश्न असला तर त्याच्या मागं उभं राहायचं. लोकांचे प्रश्न सोडवायचे. या पद्धतीने आतापर्यंत पावलं टाकली आहेत.
आंबेगाव तालुक्यातून देवदत्त निकम यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या निकम यांनी शिरुर लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविली होती. आता ते आंबेगावमधून तीव्र इच्छुक आहेत. बाजार समिती निवडणुकितही निकम यांनी वळसे यांच्या पुढे मोठे आव्हान निर्माण केले होते.