पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील भटक्याविमुक्त विद्यार्थ्यांनी जय मल्हार थिएटर्स प्रस्तुत ‘गीत बहार’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंगळवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी सांगीतिक मैफलीचा मनमुराद आनंद लुटला. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् अंतर्गत महाराणा प्रताप गौशाळेच्या सभागृहात क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, उपाध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर, नितीन बारणे, गौशाळाप्रमुख हेमाराम चौधरी, आरती शिवणीकर, ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी, प्रदीप गांधलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्येष्ठ लेखिका आणि गायिका शुभांगी मुळे तसेच गायक हेमंत वाळुंजकर यांनी मराठमोळ्या भावगीत, भक्तिगीत, लोकगीत, लावणी आणि अभिजात चित्रपटगीत या प्रकारातील एकल आणि युगुलगीतांचे सुरेल सादरीकरण करून मुलांची मने जिंकली.
कार्यक्रमाचा प्रारंभ गणेशस्तवनाने करण्यात आला. “माझी रेणुका माउली…” , गदिमा रचित “विठ्ठला तू वेडा कुंभार…” , “कबिराचे विणतो शेले…” , “विकत घेतला श्याम…” , “शंभो शंकरा…” या गीतांना विद्यार्थ्यांनी योग्य ठिकाणी दिलेली दाद गायकांना खुलवत गेली; तर “नाच रे मोरा आंब्याच्या वनात…” आणि “झुकुझुकु आगीनगाडी…” या बालगीतांवर बच्चे कंपनी इतकी बेहद्द खूश झाली की, टाळ्यांचा ठेका धरून त्यांनी सामुदायिक गायनसाथ दिली. “मन उधाण वाऱ्याचे…” या गीताने उपस्थितांना आनंदाचे उधाण आले; तर “धुंदी कळ्यांना…” ऐकताना मनाची अवस्था धुंद झाली. “बुगडी माझी सांडली गं…” या लावणीवर मुलांनी उत्स्फूर्तपणे नाच केला. “शारद सुंदर चंदेरी राती…” मुळे खरोखरच सुंदर झालेल्या मैफलीची सांगता “आमुची जेजुरी जेजुरी…” या वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकगीताने करण्यात आली. जयंत साने, मोहन पारसनीस, हेमंत पोटफोडे या वादकांनी नेटकी साथसंगत केली; तर नीना भेडसगावकर यांच्या संहितालेखन आणि निवेदनामुळे मैफल अधिकच बहारदार झाली. यावेळी सभागृहाबाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या जोरदार सरी आणि आतमध्ये सुरांचा स्वराभिषेक यामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला होता.
उदय खामकर, मारुती वाघमारे, सतीश अवचार तसेच गुरुकुलम् मधील शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. गिरीश प्रभुणे यांनी, “या विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच अशा मैफलीचा अनुभव घेऊन मनापासून त्यांचा आनंद लुटला. त्यामुळे सर्व कलाकारांना मी धन्यवाद देतो!” अशा शब्दांत आभार मानले.