गणेश विसर्जन घाटांवर महापालिका वैद्यकीय पथकांसह सुसज्ज

0
259

पिंपरी, दि. २० (पीसीबी)- शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीने वैद्यकीय पथकांसह सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या असून इतर घाटांवरही जीवरक्षक, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा पथकांची नेमणूक करण्यात आली असून नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी तसेच पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

यंदाचा गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या गजरात साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध सेवा सुविधा पुरविण्यात येत आहेत. निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव, वाल्हेकरवाडी मधील जाधव घाट, काळेवाडी मधील स्मशान घाट, पिंपळे गुरव घाट, वाकड गावठाण घाट, मोशी नदी घाट, चिखली स्मशान घाट, थेरगाव पूल नदी घाट, सुभाषनगर पिंपरी घाट आणि सांगवी येथील वेताळबाबा मंदिर घाट याठिकाणी वैद्यकीय साहित्य, औषधे आणि सुसज्ज रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक तैनात ठेवण्यात आले आहे,या वैद्यकीय पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ब्रदर, वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका वाहनचालक सफाई कामगार आदींचा समावेश आहे. दीड, तीन, पाच, सात आणि दहा दिवसांनी गणेश विसर्जन केले जाते. म्हणजेच २०, २१, २३, २५ आणि २८ सप्टेंबर या कालावधीत विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथक कार्यरत राहतील. तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोईसुविधा करण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली आहे.

गणेश विसर्जन घाटांवर विसर्जन हौद उभारण्यात आले असून स्वयंसेवी संस्थांमार्फत मूर्ती संकलन देखील केले जात आहे. पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात असून नागरिकांकडून या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे. अग्निशमन विभागाच्या वतीने शहरातील २६ विसर्जन घाटांवर लाईफ जॉकेट, रिंग, गळ, बोट, मेगा फोन, दोरी अशा रेस्क्यू साहित्यासह अग्निशमन पथक तैनात करण्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयांमार्फतही विसर्जन घाटांवर योग्य त्या सुविधा भाविकांना पुरविण्यात आल्या आहेत.

गणेश भक्तांना, मंडळांना व अन्य नागरीकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशमन विभागाच्या सुचना –

• गणेश मुर्ती विसर्जन करताना कमीत कमी कार्यकर्त्यांनी पुढे यावे.
• मनपाने घाटांवर नियुक्त केलेल्या विविध विभागांचे कर्मचारी उदा. सफाई कामगार, अग्निशामक जवान, वैद्यकिय कर्मचारी, जीवरक्षक इत्यादी अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी.
• विद्युत उपकरणे व वीज वाहक तारांपासून दूर राहावे.
• लहान मुले, अबालवृध्द अथवा अजारी व्यक्तींनी पाण्याच्या जवळ जाऊ नये.
• ज्वलनशील पदार्थ पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचा विसर्जनाच्या ठिकाणी वापर करु नये.
• नदीच्या प्रवाहाला वेग असल्याने जास्त दुर अथवा खोल पाण्यात विसर्जनाकरीता जाण्याचा प्रयत्न करु नये.
• अनाहूतपणे पाण्यात बुडत आहात असे वाटत असल्यास ओरडुन व हातवारे करुन काठावरील जीवरक्षकांचे लक्ष वेधुन घ्यावे.
• नशापान करुन अथवा अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांनी पाण्यात उतरू नये.
• महापालिकाने नियुक्त केलेल्या जीवरक्षक व अन्य सुविधायुक्त ठिकाणी मूर्तींचे विसर्जन करावे.