किशोर आवारे खून प्रकऱणात सुनिल शेळके यांना क्लिनचिट

0
1262

तळेगाव दाभाडे, दि. १८ (पीसीबी) – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनविकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर यांचा १२ मे रोजी चौघांनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. या ‘हाय प्रोफाइल’ खुनामुळे मावळासह पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी नऊ आरोपींविरुद्ध वडगाव मावळ न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आले. यात मावळचे आमदार सुनील शेळके आणि त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांचे नाव नाही. त्यामुळे या खुनातून त्यांना ‘क्लीट चिट’ मिळाल्याची मावळात चर्चा आहे.

आवारे खुनाचा मुख्य सूत्रधार पकडला गेल्याने शेळके बंधूंच्या ‘क्लीन चिट’ची शक्यता बळावली होती. याबाबत दि. ९ जुलै रोजी ‘सरकारनामा’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. आवारे खून प्रकरणात तळेगाव दाभाडे पोलिसांनी ८८ दिवसांतच वडगाव मावळ न्यायालयात चार्जशीट सादर केले. त्यातील नऊ आरोपींत शेळके बंधूंची नावे नसल्याचे या गुन्ह्याचे तपास अधिकारी आणि तळेगाव दाभाडे ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर पाटील यांनी ‘एका वृत्तपत्राला’ सांगितले. तसेच या गुन्ह्यातून आमदार शेळकेंसह त्यांच्या बंधूंची नावे वगळायची की नाही, हा निर्णय न्यायालय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पुरावा नसल्याने आरोपपत्रात नाव नसल्याचे बोलले जात आहे. यावर आमदार सुनील शेळके म्हणाले, ‘अशा दुर्दैवी घटनेचे राजकारण करणे खूप वाईट आहे. त्याचा मोठा मनस्ताप मला व कुटुंबाला झाला. या घटनेतून धडा घेत भविष्यात कोणी असे प्रकार करू नये आणि आवारे कुटुंबाबरोबर राहावे,’ असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, आवारेंच्या बंधूंच्या खुनाचा बदला खुनानेच घेण्याचा त्यांच्या समर्थक सराईत गुंडांनी रचलेला कटही पोलिसांनी नंतर उधळून लावला. त्यातून मावळात आणखी एक राजकीय खून टाळल्याचा दावाही त्यांनी केला होता.