हॉटेलसाठी त्याने पळवले १४ वर्षांच्या मुलाला…!

0
502

पिंपरी,दि.१३(पीसीबी) – हॉटेल व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने तीन बेरोजगार तरुणांनी 14 वर्षीय मुलाचे अपहरण केले. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सासवड पोलिसांसह मिळून अपहृत मुलाची सुखरूपपणे सुटका केली. तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय 21, रा. दत्त मंदिर शेजारी, मारूंजीगाव, पुणे), अर्जुन सुरेश राठोड (वय 19, रा.दत्त मंदिर शेजारी, मारुंजीगाव, पुणे), विकास संजय मस्के (वय 23, रा. शिवारवस्ती, भुमकर चौक, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

ताथवडे येथील एका भंगार व्यावसायिकाच्या 14 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस अंमलदार मोहम्मद गौस नदाफ यांना मिळाली. त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलिसांनी तीन ते चार पथके तयार करून अपहरण झालेल्या मुलाचा शोध सुरू केला. घटनास्थळाची पाहणी केली असता सीसीटीव्ही फुटेज मध्ये एका कारमधून मुलाचे अपहरण झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान अपहरण झालेल्या मुलाच्या काकांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला. ’30 लाख रुपयांची खंडणी दे. नाहीतर तुमच्या मुलाचे हातपाय तोडून त्याला मारून टाकतो’ अशा प्रकारची धमकी फोनवरील अनोळखी व्यक्तींनी दिली होती.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्या फोनचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा ठाव ठिकाणा शोधून काढला. आरोपी ताथवडे येथून सासवडच्या दिशेने जात असल्याचे पिंपरी चिंचवड पोलिसांनी सासवड पोलिसांना याबाबत माहिती दिली. सासवड पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी लावली. त्या नाकाबंदीमध्ये सासवड पोलिसांना तीनजण संशयितरित्या एका कारमधून जात असताना दिसले. सासवड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अपहरण झालेल्या 14 वर्षीय मुलाची सुटका केली.

पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यातून पोलिसांनी तीन मोबाईल फोन, एक छऱ्याचे पिस्टल, कोयता, सुरा, छन्नी, हातोडा असा ऐवज आढळून आला. अपहरण झालेल्या मुलाच्या वडिलांचा भंगार व्यवसाय असून त्यांच्याकडे भरपूर पैसे असल्याचा संशय आरोपींना होता. त्यांच्या मुलाचे अपहरण केल्यास मोठी रक्कम मिळू शकते, असा कट रचून आरोपींनी पाच दिवस परिसराची रेकी केली. त्यानंतर मुलाचे अपहरण केले. आरोपींना हॉटेल व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांना पैशांची कमतरता होती. म्हणून त्यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या अडीच तासात मुलाची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतिष माने, विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखालील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, दिपक शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, सिद्धनाथ बाबर, उपनिरीक्षक गणेश रायकर, सहायक फौजदार नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, पोलीस अंमलदार प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, रोहिदास आहे, वासुदेव मुंडे, सुरेश जायभाये, प्रशांत सैद, सुखदेव गावडे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, पोलीस अंमलदार नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली.