साताऱ्यात तणाव…! सोशल मीडियावर महापुरुषांचा अवमान, वातावरण पेटले

0
280

सातारा,दि.११(पीसीबी) – समाजमाध्यमांवर महापुरुषांची बदनामीकारक मजकूर प्रसारीत झाल्याच्या घटनेचे रात्री खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे तीव्र पडसाद उमटले. एका गटाने विशिष्ठ समुदायास लक्ष्य करत जाळपोळ, दगडफेक करत प्रार्थना स्थळावर हल्ला केला. यात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात तणाव असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले असून खबरदारी म्हणून सर्व इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

पुसेसावळी येथील एका समाजमाध्यम समूहावर महापुरुशांच्या अनुषंगाने आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाला होता. हा मजकुर एका विशिष्ठ समुदायातील युवक प्रसारीत करत असल्याचा संशयावरून रात्री 9.30 च्या सुमारास बहुसंख्य समाजातील युवक पुसेसावळी बाजारात जमा झाले. या युवकांनी विशिष्ट समाजाची घरे, दुकाने, हातगाडे, वाहने लक्ष्य करत दगडफेक सुरू केली. याचदरम्यान हिंस्त्र जमावाने घरे, दुकाने यांना आग लावण्यास सुरुवात केली. 2 ते 3 हजार युवकांचा जमान आक्रमकपणे जाळपोळ करत पुढे सरकत होता.

या जमावाने त्याच परिसरातील एका प्रार्थनास्थळाच्या दिशेने चाल केली. यावेळी त्या प्रार्थनास्थळामध्ये सात ते आठ जण प्रार्थनेसाठी जमले होते. आक्रमक जमावाने प्रार्थनास्थळात घुसून आतमधील युवकांना मारहाण केली. या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सूरू आहेत. संबधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा पोलिस मुख्यालयातून मोठा पोलिस फौजफाटा पुसेसावळी गावाकडे पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर सांगली, कोल्हापुर या जिल्ह्यातून देखील जास्तीचा बंदोबस्त पुसेसावळी गाव परिसरात तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळास रात्री कोल्हापुर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी भेट दिली आहे.

दरम्यान पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापु बांगर व आतर वरिष्ठ पोलिस आघिकारी पुसेसावळी परिसरात तळ ठोकून आहेत. या घटनेनंतर आतर कोणत्याही अफवा पसरू नयेत यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाययोजना म्हणून परिसरातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. पोलिसांनी सर्व नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. इतर कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच अशा प्रकारच्या अफवा कोणी पसरवत असल्याचे निदर्शनास आल्यास याबाबतची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.