पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 29 टोळ्यांमधील 245 सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. भोसरी मधील गायकवाड, दिघी मधील विटकर टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाईचे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी आदेश पारीत केले आहेत.
भोसरी परिसरातील टोळी प्रमुख सुमेध ऊर्फ गोटया लहू गायकवाड (वय 26, रा. सांस्कृतिक भवन शेजारी सिध्दार्थनगर, दापोडी), अनिकेत ऊर्फ बॉक्सी शिरीष पठारे (वय 24, रा. कमलकुंज वार्ड नं. 5, दापोडी) आणि त्याच्या साथीदारावर सात गुन्हे दाखल आहेत. दिघी परिसरातील टोळी प्रमुख शाम रवि विटकर (वय 22, रा. साठेनगर, पद्मावती रोड, आळंदी ता.खेड), ज्ञानेश्वर सिध्दार्थ बडगे (वय 30, रा. साठेनगर, पद्मावती रोड, आळंदी ता.खेड), राकेश सुरेश काळे (वय 23, रा. अण्णाभाऊ साठेनगर, आळंदी देवाची ता.खेड), अजय किसन देवरस (वय 23, रा. पद्मावती झोपडपट्टी, आळंदी देवाची, पुणे) आणि साथीदारांवर नऊ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
वरील दोन्ही टोळी प्रमुखांनी त्यांच्या साथीदारांसह प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदारांना सोबत घेऊन स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने, गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी भोसरी, दिघी, आळंदी, सांगवी, चतुःश्रृंगी, फरासखाना, येरवडा परिसरात खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी, दरोडा, दुखापत करणे, पुरावा नष्ट करणे, गैरकायदयाची मंडळी जमवुन सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशिररित्या घातक शस्त्र व घातक हत्यारे जवळ बाळगणे, बेकायदेशिररित्या जमाव जमवून खुनाचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे, पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था राखणेकामी काढलेल्या आदेशांचा भंग करणे असे गुन्हे केले आहेत. त्यांचा गुन्हेगारी चा आलेख वाढत असल्याने त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त विवेक पाटील, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर सतिश कसबे, राजेद्रसिंग गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, सुनिल भदाने, अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, राजेंद्र राठोड, वसंत दळवी, चेतन साळवे, किशोर कांबळे, वैभव काकडे यांच्या पथकाने केली.









































