राधाकृष्ण विखे-पाटलांवर उधळला भंडारा, आंदोलकाला लाथाबुक्क्याने जोरदार मारहाण

0
275

महाराष्ट्र, दि. ८ (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असतानाच आता इतर समाजांच्या आरक्षणांची मागणीही समोर येत आहे. दरम्यान, आज धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना रोषाला सामोरे जावे लागले. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी निवेदन देताना धनगर आरक्षण कृती समितीच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्यावर भंडारा उधळला.

आज सोलापूरमध्ये असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी धनगर आरक्षम कृती समितीच्या काही कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यावेळी या समितीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी विखे पाटील यांना निवेदन दिले. मात्र हे निवेदन देत असताना तिथे उपस्थित असलेल्या धनगर आरक्षण कृती समितीच्या एका कार्यकर्त्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला. त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्यांनी या कार्यकर्त्याला पकडून त्याला मारहाण केली.

दरम्यान, विखे पाटील यांच्यावर भंडाळा उधळणाऱ्या कार्यकर्त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेल्या कृत्याचं स्पष्टीकरण दिलं. त्याने सांगितले की, धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं धनगर समाजासाठीच्या घटनादत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी, त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागू नये, यासाठी आम्ही निवेदन दिलं. येणाऱ्या काळात धनगर आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर नाही झाली, तर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील त्यांना काळं फासायला धनगर समाज मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.