किवळेत मद्यधुंद मजुराने केला सहकारी तरुणाचा खून

bpcauthor bpcauthor
2 Min Read

रावेत , दि. ५ (पीसीबी) – पगार झाल्यानंतर दारू पिण्यासाठी बसलेल्या दोन मजुरांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यातून एका मजुराने सहकारी मजूर तरुणाचा डोक्यात सिमेंटची वीट घालून खून केला. ही घटना किवळे येथे सोमवारी (दि. 4) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली.

विवेक गणेश पासवान (वय 24, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. शिवकुमार घनश्याम प्रजापती (वय 19, रा. मूळ रा. बिरैचा कला, पोस्ट. खंबा, ता. रिधवली, जि. बस्ती, उत्तरप्रदेश) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनेश विलास यादव (वय 20, मूळ रा. बिरैचा कला, पोस्ट. खंबा, ता. रिधवली, जि. बस्ती, उत्तरप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गालग किवळे येथे रुणाल गेटवे सोसायटीजवळ निर्माण माईल स्टोन ही बांधकाम साईट आहे. या साईटवर मयत विवेक पासवान, संशयित दिनेश यादव आणि फिर्यादी शिवकुमार प्रजापती यांच्यासह अन्य काही जण फरशी बसविण्याचे काम करतात. त्यातील मयत विवेक हा इतर पाच जणांसह साईटवरील पत्र्याच्या खोलीमध्ये राहण्यास होता. त्याचा आणि त्याच्यासोबतच्या इतर मजुरांचा रविवारी पगार झाला. त्यामुळे मयत विवेक याने काही मजुरांसह पार्टी केली. त्यानंतर विवेक याच्या खोलीतील इतर चौघे मजूर झोपले असता विवेक आणि दिनेश यादव हे दोघेही पुन्हा मद्यपानासाठी गेले. मद्यपान करून आल्यानंतर त्यांच्यामध्ये किरकोळ भांडण झाले. यात दिनेश यादव याने विवेक पासवान याच्या तोंडावर सिमेंटची विट मारली. यात गंभीर जखमी होऊन विवेक याचा मृत्यू झाला. त्यानंतर दिनेश यादव हा तेथून पळून गेला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article