पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आज शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देत आहे. महापालिका स्थापन झाल्यापासून अशा प्रकारचा पुरस्कार देण्याची या महापालिकेची परंपरा आहे. विद्यार्थ्याचे यश हे शिक्षकांच्या शिकविण्यावर अवलंबून असते, शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा, संस्काराचा परिणाम विद्यार्थ्यावर होत असतो, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचे अभिनंदन करून शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना दूरध्वनी संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. महानगरपालिकेच्या वतीने आज शिक्षक दिनानिमित्त चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार वितरण कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच महापालिका शाळांतील शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.आयुक्त शेखर सिंह यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे पाठविलेल्या संदेशात सांगितले, शिक्षकांसाठी विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो. विद्यार्थ्यांना बदलत्या जगाची ओळख करून देऊन त्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम शिक्षक करत असतात. शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी महापालिका यशस्वी प्रयत्न करित असून महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची भविष्यात संख्या वाढेल असा विश्वास व्यक्त केला तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या सर्व शिक्षकांचे अभिनंदनही केले आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी अधिकतम प्रयत्न करित असून विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येच्या प्रमाणात वर्गांची संख्येत वाढ करणेकामी आढावा घेत असून शिक्षकांचे प्रमाण देखील वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच जांभळे पाटील यांनी मी स्वत: शिक्षक होतो त्यामुळे शिक्षकांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याची मला जाणीव असल्याचे सांगितले. आज देण्यात आलेले पुरस्कार हे गुणवत्तेच्या आधारावर दिले असून त्यामध्ये शिक्षकांच्या शिकविण्याच्या पद्धती, त्यांचे योगदान अशा विविध बाबींचा विचार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक होणे ही सोपी बाब नाही, मुलांच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये शिक्षकांचा मोठा वाटा असतो. शिक्षकांनी दिलेले संस्कार, शिक्षण विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडतात, असे सांगून सर्वांच्या आयुष्यात शिक्षकांचे योगदान महत्वपुर्ण असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले, आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार वितरणाचा हा सुंदर सोहळा पार पडत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका सतत प्रयत्नशील असते. महापालिकेच्या शिक्षकांच्या प्रयत्नाने शिक्षणाचा दर्जा उंचावत असतो. त्याचाच परिणाम म्हणजे शाळेच्या उत्तम कामगिरीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे असे सांगून जगताप यांनी मला स्वत:ला महापालिका शाळेतून उत्तम शिक्षण मिळाल्याने मी आज अतिरिक्त आयुक्त पदापर्यंत पोहोचलो असल्याचे सांगून महापालिकेच्या शाळेत घेतलेल्या शिक्षणाचा सार्थ अभिमान असल्याचेही जगताप यांनी सांगितले व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाची सुरूवात स्वागतगीताने करण्यात आली. स्वागतगीत झाल्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी प्रस्ताविकात वर्षभर शिक्षण विभागाच्या वतीने चांगले उपक्रम राबविण्यात आले असे सांगून या उपक्रमांमध्ये सर्व शिक्षकांचे योगदान लाभले याबद्दल समाधान व्यक्त केले.आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये प्राथमिक विभागातील मोहम्मद शाहबाद, अमिता रसाळ, नीता बोचरे, योगिता पर्बत, नितीन गोडे, योगिता सोनवणे, जयश्री राऊत, अनिता जगताप या शिक्षकांचा समावेश आहे तर माध्यमिक विभागातील सोमनाथ देवरे, अस्मिता गुरव, वर्षा हडपसरकर या शिक्षकांचा तर बालवाडी विभागातील पूनम कोलते, शैला जाधव, शबाना मोमीन या शिक्षकांचा आणि खाजगी विभागातील विजयकुमार सोळुंके, शारदा सस्ते या शिक्षकांचा समावेश होता. महापालिकेच्या वतीने विशेष पुरस्कारही देण्यात आले. त्यामध्ये म्हेत्रेवाडी येथील पीसीएमसी पब्लिक स्कूल, कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळांचा तसेच सुरेखा कुंजीर, सविता गावडे, मंजुषा अहिनवार, सारिका राऊत, शिवाजी दौंडकर, वासंती चव्हाण आणि मोमीन मोहसीन उपशिक्षकांचा समावेश होता